सांगली जिल्ह्यात ५८,४९१ विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अर्धवट, शिक्षक अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 05:29 PM2023-05-11T17:29:32+5:302023-05-11T17:30:14+5:30
'आधारची ऑफलाईन पडताळणी करा'
सांगली : जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ३४८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल पोर्टलवर अवैध ठरले आहेत. १८ हजार १४३ विद्यार्थ्यांनी आधारच काढले नसल्यामुळे एकूण ५८ हजार ४९१ विद्यार्थ्यांमुळे शिक्षक अडचणीत आहेत. विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेच्या पटावर असले तरी शिक्षण विभागाच्या अधिकृत नोंदीत नाहीत. येत्या १५ मेपर्यंत संचमान्यता अंतिम होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या आधारचे काम न झाल्यास शंभरहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीच्या वर्गात चार लाख ३२ हजार ५८ विद्यार्थी संख्या आहे. यापैकी ४० हजार ३४८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपात्र ठरले. तसेच १८ हजार १४३ विद्यार्थ्यांचे आधारच नाही. संचमान्यता करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रक दिले आहे. त्यानुसार शाळाना स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी १५ मेपर्यंत मुदत आहे. ज्या शाळांनी आधार नोंदणी केलेली आहे, तेवढेच विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या आधार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या आधारेच शाळांची संचमान्यता होणार आहे.
आधार आधारित संचमान्यतेला अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांचाही विरोध आहे. विद्यार्थ्यांचे शाळेतील नाव, जन्म दिनांक, इतर माहिती आणि आधार कार्डवरील माहिती यात विसंगतीमुळे आधार नोंदणी वेळेत पूर्ण होणार नाही. आधार व त्यावरील चुका दुरुस्ती करण्याचे काम शिक्षक आणि मुख्याध्यापक करत आहेत. पण, ते वेळेत झाले नाही तर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे.
संचमान्यता आॉफलाईनच करा : कृष्णा पोळ
आधार क्रमांक लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यतेत विचारात न घेतल्यास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. शाळा प्रवेशासाठीच आधार कार्ड सक्तीचे नसेल तर संचमान्यतेसाठी आधार कार्डची सक्ती शासनाने करू नये, अशी मागणी शिक्षक भारतीचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केली आहे. संचमान्यता ऑफलाईन पद्धतीनेच केली पाहिजे, अशीही त्यांची मागणी आहे.
आधारची ऑफलाईन पडताळणी करा
शाळांची पटपडताळणीवर आधारित संचमान्यता करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेची आहे. आधार नसलेले किंवा आधार डेटा मिसमॅच असलेले विद्यार्थ्यांचे प्रमाण एका शाळेत १० ते १५ टक्केच आहे. त्यामुळे तेवढे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. आधार नसलेले व मिसमॅच असलेल्या विद्यार्थ्यांची आॉफलाईन पडताळणी करावी, अशीही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी मागणी केली आहे.