आटपाडीत हवा खमक्या पोलिस अधिकारी
By admin | Published: June 6, 2016 11:48 PM2016-06-06T23:48:42+5:302016-06-07T07:33:08+5:30
शेलार यांची बदली : नवीन अधिकाऱ्याची प्रतीक्षा; राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगार मोकाट
अविनाश बाड --आटपाडी पोलिस ठाण्याचा कार्यभार गेल्या १० वर्षांत प्रथमच पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्याकडे आहे. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांची मिरज शहर पोलिस ठाण्यात बदली झाली. ते शनिवार, दि. ४ रोजीच तिथे हजर झाले. हे पोलिस ठाणे नव्या पोलिस निरीक्षकांच्या प्रतीक्षेत आहे. आटपाडीत खमक्या पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
आटपाडी हे सांगली मुख्यालयापासून सुमारे १०० किलोमीटरवर असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची या पोलिस ठाण्याला अपवादानेच भेट होते. आटपाडी म्हणजे दुष्काळी-मागास असे म्हणून एरवी येथे यायला तयार नसलेले अनेक विभागाचे अधिकारी मात्र येथील सेवा संपवून जाताना खूश झालेले असतात. पुन्हा येथे येण्यासाठी उत्सुक असतात, ही वस्तुस्थिती अनेकदा स्पष्ट झाली आहे.
आटपाडी तालुक्यात अपवाद वगळता सर्वत्रच अवैध धंद्यांना कायम ऊत आलेला असतो. पोलिस ‘कारवाई’ करतात; पण पुन्हा अवैध धंदे सुरूच असतात. अवैध धंद्यांबद्दलच नव्हे, तर राजकीय दबावाखाली येऊन पोलिस अनेकदा मारामारीची कारवाई केवळ कागदोपत्री करीत असल्याने, कायद्याचा धाक न वाटल्याने पुढे मोठ्या मारामाऱ्या होत आहेत.
आटपाडी पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप ही तर अलीकडे नित्याचीच बाब ठरली आहे. अदखलपात्र गुन्हा दाखल होत असलेल्या प्रकरणातही राजकारणी हस्तक्षेप करताना दिसतात. कोणत्याही दिवशी आटपाडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधलेल्यांची चौकशी कधी केली गेली, तर अनेक पुढाऱ्यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर येईल. विशेष म्हणजे एकाच संशयितासाठी अनेक पुढाऱ्यांचे म्हणणे योग्य असेल, त्यांच्या सांगण्यामुळे निष्पापावर अन्याय केला जाऊ नये, हे त्यांचे म्हणणे असेल, तर समजण्यासारखे आहे. पण अनेकदा कितीही चुकीचा वागला असला, तर कार्यकर्ता आहे म्हणून पोलिसांवर दबाव आणला जात असेल, तर येणाऱ्या काळात तालुक्यातील शांतता, सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याचीच भीती आहे. त्यामुळे हे पुढारी तालुक्याचे हित बघतात, का फक्त त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा राजकीय गट प्रबळ करण्यासाठी बेफिकिरीने वागतात, याची तालुकावासीयांनीच काळजी घेण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांत आटपाडी पोलिस ठाण्यात राजकीय दबावामुळे खोटे गुन्हे दाखल होत असल्याचीही चर्चा वारंवार रंगते. मग या पोलिस ठाण्यातील अधिकारी यावर ‘तडजोडी’चा मार्ग निवडतात. पण त्यासाठी पुढाऱ्यांच्या हातचे बाहुले बनत असल्याची वस्तुस्थिती आहे. एका पुढाऱ्याने अटक करा म्हणून दम दिला की, त्यासाठी फिर्यादीकडून आधी ‘मलिदा’ घेतात, नंतर सोडून द्या म्हणून दुसऱ्या पुढाऱ्याचा फोन आला की, पुन्हा खिसा भरून सोडून देतात, असे सर्रास बोलले जाते. यातून पोलिसांचे भरलेले खिसे लोकांना दिसत नसले तरी, लोकांसमोर कायद्याचा धाक कमी झाल्याचा वाईट संदेश पोहोचत आहे.
त्यासाठी आता आटपाडी पोलिस ठाण्यात खमक्या अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे आहे. चांगला अधिकारी मिळेल, अशी आटपाडी तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. असे झाले तरच येथील गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे.
राजकारणासाठी : पोलिसांचा वापर
राजकारणासाठी पोलिसांचा अनेक पुढारी वापर करून घेत असल्याची चर्चा कायम होते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते मारामारीनंतर आधी पोलिस ठाण्यात जाण्याऐवजी पुढाऱ्यांकडे जातात. मग सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? याच पोलिस ठाण्यात कोणत्याच पुढाऱ्याला न जुमानता कठोर कारवाई करणाऱ्या सतीश पळसदेकर, संजय पाटील या अधिकाऱ्यांची नावे ८-१० वर्षांनंतर आजही आटपाडीकरांच्या लक्षात आहेत. असे अधिकारी येथे देण्याची गरज आहे.