आटपाडीत खासगी स्पर्धा परीक्षांवर बंदी

By admin | Published: July 10, 2015 11:37 PM2015-07-10T23:37:58+5:302015-07-10T23:51:18+5:30

पंचायत समितीचा आदेश : शालेय विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार

AAPPADi private competition examinations ban | आटपाडीत खासगी स्पर्धा परीक्षांवर बंदी

आटपाडीत खासगी स्पर्धा परीक्षांवर बंदी

Next

अविनाश बाड -आटपाडी -विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खासगी स्पर्धा परीक्षांवर आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यात बंदी घातली आहे. तालुक्यातील कोणत्याही शाळेत खासगी स्पर्धा परीक्षा घेऊ नयेत, असा आदेश विभागाने दिला आहे. त्यामुळे आता पालकांची आर्थिक लूट आणि विद्यार्थ्यांवरील अकारण ताण थांबणार असला तरी, कमिशनला चटावलेल्या गुरुजींचे चेहरे मात्र पडले आहेत.
शासनाचा शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषदेची मान्यता नसताना, वेगवेगळ्या खासगी संस्था पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेऊन वेगवेगळ्या खासगी स्पर्धा परीक्षांचे आयोजन काही वर्षांपासून करीत आहेत. एकीकडे शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांची आवड व कल लक्षात घेऊन शिक्षण देणे बंधनकारक असताना, गेल्या काही वर्षांपासून अकारण खासगी स्पर्धा परीक्षांचा सुळसुळाट झाला आहे. काही पालकांनाही अशा परीक्षांमध्ये विद्यार्थ्याने गुण मिळविले की, दुसरी-तिसरीतला मुलगा जिल्हाधिकारी झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. वास्तविक अशा परीक्षांमुळे लहान मुलांच्या बालमनावर परीक्षा आणि पालकांच्या अपेक्षांमुळे अकारण तणाव वाढत आहे. यातून भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
शासनाने चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. खासगी परीक्षा मात्र दुसरीपासून घेण्याचा पायंडाच पडला होता. खासगी स्पर्धा परीक्षा घेणारे शाळांतून येऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे टक्केवारी देऊन व अन्य आमिषे दाखवून तयार करायचे, मग शिक्षक पालकांना व विद्यार्थ्यांना पटवायचे. ४० रुपये किमतीचे पुस्तक ४०० रुपयांना माथी मारून परीक्षा शुल्काच्या नावाखाली पालकांची लूट सुरू होती. वार्षिक अभ्यासक्रम संपविणे हेच जरूरीचे आणि बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे जिकिरीचे बनलेले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना कोठेही खासगी स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देत नव्हते. टक्केवारी घेतल्यानंतर वर्षातून एकदा एका ठिकाणी परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि निकालाबद्दलही शंका उपस्थित होत होत्या. मुले अशा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत, पण शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मात्र ही मुले कोठेच दिसत नव्हती.

कोणत्याही शाळेकडे अथवा शिक्षकाकडे कोणताही व्यापार करण्याचा परवाना नसतो. त्यामुळे शासकीय परीक्षांशिवाय इतर कोणत्याही खासगी स्पर्धा परीक्षा घेणे, त्यासाठी पुस्तके विकत घेणे, ती विद्यार्थ्यांना विकत देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सर्व केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन, कोणत्याही शाळेत खासगी स्पर्धा परीक्षा घेऊ नयेत, अशी सक्त सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी स्वत: प्रश्नपत्रिका काढून चाचणी परीक्षा घ्याव्यात.
- आर. आर. आटुगडे, गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, आटपाडी

गुरुजी तुम्हीसुध्दा?
सध्या अनेक गुरुजी वेगवेगळ्या साखळी योजनांतून पत्नीच्या नावे ‘एजंट’ होऊन पैसा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुतांशी शिक्षक आमिषापोटी भुलत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे शाळा बंद पडत असताना, आटपाडी शिक्षण विभागाने तालुक्यात खासगी स्पर्धा परीक्षांना पायबंद घालून नवा आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: AAPPADi private competition examinations ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.