कडेगाव तालुक्याला सभापतिपदाची ‘आॅफर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2015 10:42 PM2015-06-28T22:42:12+5:302015-06-29T00:26:43+5:30
विटा बाजार समिती निवडणूक : विरोधी पॅनेलचा अजेंडा : सत्ताधाऱ्यांना आव्हान
दिलीप मोहिते-विटा --खानापूर तालुक्याच्या विभाजनापूर्वी स्थापन झालेल्या विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आता कडेगाव व खानापूर हे दोन तालुके कार्यक्षेत्र झाले असून, या दोन तालुक्यांच्या संयुक्त असलेल्या विटा बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारी दाखल केलेल्या व सत्ताधाऱ्यांत नाराजी असलेल्या इच्छुक उमेदवारांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने निशाणा साधला आहे. यावेळी विरोधी पॅनेलच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अॅड. बाबासाहेब मुळीक व कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी यावर्षी कडेगाव तालुक्याला बाजार समितीचे सभापतीपद देण्याची ‘आॅफर’ दिली असून, कडेगाव तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती देण्याचाही अजेंडा जाहीर केला आहे.
विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला आता रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांचे वर्चस्व असलेल्या बाजार समितीत यावेळी आ. बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्यातील युतीवर जवळ-जवळ शिक्कामोर्तबच झाले आहे. मात्र, औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे या युतीतील जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. या युतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक व कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील यांना अद्यापपर्यंत तरी निमंत्रित केले नसल्याचे समजते.
त्यामुळे बाजार समितीसाठी सत्ताधारी आ. बाबर यांच्याविरोधात अॅड. बाबासाहेब मुळीक व सदाशिवराव पाटील हे विरोधी पॅनेलचे उमेदवार म्हणून लढतीच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगण्यात येते. अॅड. मुळीक यांच्या विरोधी पॅनेलमध्ये जुन्या शिवसेना व भाजपच्या गटाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस व माजी आ. सदाशिवराव पाटील यांचा कॉँग्रेस गट एकत्रित करून सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे करण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कडेगाव तालुक्यातील संभाव्य इच्छुक उमेदवारांना विरोधकांनी लक्ष्य केले आहे. त्यांच्याबरोबरच सत्ताधारी गटातील नाराजांनाही विरोधकांनी आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कडेगाव तालुक्यातील संस्था व उमेदवार विरोधी पॅनेलमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विरोधी गटाचे अॅड. मुळीक यांनी सत्तेत आल्यानंतर कडेगाव तालुक्याला यावेळी सभापतीपद देण्याची आॅफर दिली आहे, तर खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून कडेगाव तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे गाजरही दाखविण्यात आले केले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीला आता रंगत येण्यास सुरुवात झाली आहे.
विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्यावेळी आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत होतो. आम्हाला १-२ जागा दिल्या होत्या. परंतु, त्यावेळी पदाधिकारी निवडीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. कोणालाही विश्वासात न घेता पदाधिकारी निवडी झाल्या. त्यामुळे आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार आहोत. सर्व जागांवर आम्ही सक्षम उमेदवार दिले आहेत. सत्तेत आल्यानंतर कडेगाव तालुक्याला पहिल्यांदा सभापतीपद व कडेगाव तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती देणे हा आमचा अजेंडा आहे.
- अॅड. बाबासाहेब मुळीक, कार्याध्यक्ष, खानापूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी
समविचारी नेते विरोधासाठी सरसावले
विटा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधी अॅड. बाबासाहेब मुळीक व माजी आमदार सदाशिवराव पाटील समर्थकांनी पॅनेलची जुळणी केली आहे. जुन्या शिवसेना गटाचे संजय विभुते, सुभाष मोहिते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, शेतकरी संघटनेचे नवनाथ पोळ यांच्यासह समविचारी लोकांची एकत्रित मोळी बांधण्यात माजी आ. पाटील व अॅड. मुळीक यांना यश आले आहे. त्यामुळे विटा बाजार समितीसाठी विरोधी पॅनेलमधून मैदानात उतरून सत्ताधारी आ. बाबर, मोहनराव कदम व पृथ्वीराज देशमुख यांच्या युतीला आव्हान देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे.