आरेवाडीचे गजनृत्य आता बेंगलोरमध्ये
By admin | Published: March 6, 2017 11:54 PM2017-03-06T23:54:03+5:302017-03-06T23:54:03+5:30
राष्ट्रीय महोत्सवात सहभाग : कालाकारांना मिळाला बहुमान; भारतीय लोकपरंपरेचे चित्र
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील धनगरी गजनृत्याला कर्नाटकमधील बेंगलोर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात सांस्कृतिक कार्यक्रमातही या गजनृत्याने सहभाग नोंदविला आहे.
१९५८ मध्ये दिल्ली येथे हे गजनृत्य पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कौतुकास पात्र ठरले होते. २००१ मध्ये या कलाकारांनी इंग्लंड दौरा केला होता, तर २००९ मध्ये रशियातील मॉस्को शहरात सादरीकरण केले होते. २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ४८ कलाकारांनी नृत्य सादर करुन संपूर्ण जगभर ही कला पोहोचवली होती. दिल्ली, पणजी, पुणे, नागपूर, मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत असा या कलेचा प्रसार झाला आहे. (प्रतिनिधी)
कलेचे जतन
धनगरी गजनृत्याचे अभ्यासक दाजी कोळेकर म्हणाले की, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या गजनृत्याला कॅम्पेन नृत्य असेही म्हणतात. कैलासपती भगवान शंकराचा अवतार असलेल्या बिरोबा देवाच्या आराधनेतून या नृत्याची निर्मिती झाली आहे. पूर्वी डोंगर, दऱ्यामध्ये रानावनात मेंढपाळ म्हणून व्यवसाय करणारे धनगर समाजबांधव रात्री बिरोबाची आराधना करण्यासाठी हे नृत्य ढोलांच्या तालावर करत. गज म्हणजेच हत्तीसारखे डोलत केले जाणारे हे नृत्य गजनृत्य म्हणून ओळखले जाते. गजनृत्याचे अनेक प्रकार नामशेष झाले असले तरी, ४ ते १० प्रकार अद्याप कलाकारांनी जतन केले आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये १५ ते २० उपप्रकार आहेत. असे कला सादर करणारे कलाकार ८ ते २० पर्यंत असतात.