आबा-घोरपडे गटात पुन्हा चुरस
By admin | Published: July 19, 2014 12:00 AM2014-07-19T00:00:06+5:302014-07-19T00:13:11+5:30
कवठेमहांकाळ सभापती : सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती पद खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांना या पदाचे डोहाळे लागले आहेत. या आरक्षणाने गृहमंत्री आर. आर. पाटील गटातील वैशाली पाटील, तर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाच्या आशाताई पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत.
तालुक्यात विधानसभेसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असताना, पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे, तर हे सभापती पदाचे आरक्षण खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांच्या आशा तर पल्लवीत झाल्याच आहेत, परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
पंचायत समितीची दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली. यामध्ये दहा जागांपैकी आठ जागा गृहमंत्री आबा गटाच्या वाटणीला आल्या, तर दोन जागा घोरपडे गटाच्या वाट्याला आल्या. कोंगनोळी पंचायत समिती गणातून आशाताई पाटील, तर मळणगाव पंचायत समिती गणातून बाळासाहेब कुमठेकर हे घोरपडे समर्थक राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आले.
अजितराव घोरपडे हे राष्ट्रवादीत नाहीत. तरीही हे दोन पंचायत समिती सदस्य त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सद्यस्थितीच्या पंचायत समितीच्या राजकारणाचा विचार करता, कवठेमहांकाळ पंचायत समितीवर आबा गटाचे पूर्ण वर्चस्व आहे. फक्त आशाताई पाटील आणि बाळासाहेब कुमठेकर हे दोनच सदस्य घोरपडे यांचे आहेत, तर उर्वरित आठ सदस्य हे आबांचे आहेत.
सभापतीपद खुल्या गटातील महिलांसाठी असल्याने आबा गटाकडे वैशाली पाटील या खुल्या वर्गातील सदस्या आहेत, तर घोरपडे गटाकडे आशाताई पाटील या एकमेव खुल्या गटातील सदस्या आहेत. कुची पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या पाटील यांची सभापती पदासाठी वर्णी लागणार हे निश्चित मानले जाते. (वार्ताहर)