सत्तेसाठी निष्ठेला अलविदा, सांगली जिल्ह्यात महिनाभरात कुणी कशा मारल्या कोलांटउड्या.. वाचा सविस्तर
By संतोष भिसे | Published: October 23, 2024 05:53 PM2024-10-23T17:53:55+5:302024-10-23T17:55:14+5:30
संतोष भिसे सांगली : जिल्ह्यातील विधानसभा तिकिटासाठी घायकुतीला आलेले इच्छुक अखेरच्या क्षणी कोणत्याही पक्षाच्या तंबूत आश्रय घेऊ लागले आहेत. ...
संतोष भिसे
सांगली : जिल्ह्यातील विधानसभा तिकिटासाठी घायकुतीला आलेले इच्छुक अखेरच्या क्षणी कोणत्याही पक्षाच्या तंबूत आश्रय घेऊ लागले आहेत. गेली पाच वर्षे ज्या पक्षाच्या आणि संघटनेच्या ध्येयधोरणाचा प्रचार केला, त्याला पायदळी घेत प्रत्येकजण आमदारकीची झूल अंगावर चढविण्यासाठी शड्डू ठोकून तयार झाला आहे. इकता पक्षनिष्ठेचा भाव घसरला आहे.
गेल्या पाच वर्षांत सांगली जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ - श्रेष्ठ नेते भाजपच्या वळचणीला गेले. अर्थात, वेगवेगळ्या निवडणुकांत त्यांनी भाजपचा प्रचार कितपत प्रामाणिकपणे केला, हे त्या - त्या वेळच्या निकालांतून दिसूनही आले. आता विधानसभेला पक्ष संधी देणार नाही. याची चिन्हे दिसू लागल्यावर त्यांनी कमळाला सोडचिठी देण्याची तयारी चालवलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मानाची पदे भूषविणारे तिकीट मिळत नाही म्हटल्यावर चक्क पक्षाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांचा जयजयकार करणारे आणि भाजपची निष्ठा पायदळी घेणारे नेते आता विधानसभेला भाजपचीच उमेदवारी मिळावी म्हणून उठाबशा काढताना दिसत आहेत.
विशेषत: जत आणि मिरजेतील राजकारण दिवसागणिक बदलत आहे. नेत्यांचे विविध राजकीय रंग मतदारांची मती गुंग करीत आहेत. गेली २० वर्षे भाजपसोबत राहून भगव्या झालेल्या प्रा. मोहन वनखंडे यांनी आमदारकीसाठी शेवटच्या टप्प्यात जनसुराज्य आणि भाजपचा स्वतंत्र गट तयार केला. त्याचाही काही उपयोग होत नाही म्हटल्यावर थेट काँग्रेसचाच शेला गळ्यात अडकवून घेतला. जतमध्ये खुद्द भाजपमध्येच रणधुमाळी माजवली आहे. सांगलीत सुधीर गाडगीळ यांनी रितसर रिटायरमेंट जाहीर केल्याने अनेकांच्या आमदारकीच्या सुप्त इच्छा-आकांक्षा उफाळून आल्या. पण, पक्षाने गाडगीळ यांचाच मोहरा पुढे केल्याने हवा गेलेले फुगे सांगली - मुंबई - सांगली अशी पळापळ करू लागले आहेत.
सत्तेसाठी निष्ठेला अलविदा, पाहा महिनाभरातील कोलांटउड्या..
- भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निशिकांत पाटील कमळ सोडून घड्याळाच्या वाटेवर.
- लोकसभेला विशाल पाटील यांचे पाकीट संजय पाटील यांच्याविरोधात फडकवणारे अजितराव घोरपडे आता संजय पाटील यांच्या दिशेने
- गेली पाच वर्षे स्वत:ला काँग्रेसचा निष्ठावान पाईक म्हणविणारे मिरजेचे विज्ञान माने वंचितच्या आश्रयाला.
- गेल्या १५ वर्षांपासून मिरजेत कमळाला पाणी घालणारे प्रा. मोहन वनखंडेंचा आता काँग्रेसच्या हातात हात.
- घड्याळाच्या टिकटिकवर राजकारणाची वेळ साधू पाहणारे विट्याचे वैभव पाटील तुतारी उंचावण्याच्या तयारीत.
- लोकसभेला काँग्रेस बंडखोरासाठी भाजपला ठेंगा दाखविणारे जतचे विलासराव जगताप आता गोपीचंद पडळकर नकोत म्हणून पुन्हा भाजपमध्येच संघर्षाच्या पवित्र्यात.
- आटपाडीला गेले दशकभर भाजपसोबत भगवे झालेले राजेंद्रअण्णा देशमुख विधानसभेसाठी तुतारीच्या आवाजात आवाज मिसळणार.
- लोकसभेला भाजपच्या लोकांनी घात केल्याचा आरोप करणारे माजी खासदार संजय पाटील मुलगा प्रभाकरसाठी घड्याळ बांधण्याच्या विचारात.