मिरजेतील कत्तलखाना सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:46+5:302021-05-29T04:21:46+5:30
मिरज : मिरज -बेडग रस्त्यावरील कत्तलखाना बंद करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्याचे पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. ...
मिरज : मिरज -बेडग रस्त्यावरील कत्तलखाना बंद करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्याचे पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. मात्र कत्तलखाना सुरुच असून बंदचे कोणतेही आदेश दिले नसल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. यामुळे पंचायत समिती व महापालिका प्रशासनात पुन्हा संघर्षाची चिन्हे आहेत.
प्रदूषणामुळे मिरजेतील कत्तलखाना बंद करण्याची पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.गेली तीन वर्षापासून मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत या विषयावर चर्चा होत आहे. कत्तलखान्याच्या दुर्गंधीने परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. उघड्यावर टाकलेल्या जनावरांच्या अवयवामुळे मोकाट कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले सुरु आहेत. याबाबत नागरिक आंदोलन करीत आहेत. मात्र कत्तलखान्याचे प्रदूषण व तो बंद करण्याच्या मागणीबाबत महापालिकेचे दुर्लक्ष आहे. याबाबत पंचायत समिती उपसभापती अनिल आमटवणे, किरण बंडगर यांच्यासह सदस्यांनी कत्तलखाना बंद करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही याबाबत निर्णय झालेला नाही. शुक्रवारी पंचायत समिती सभेपूर्वी कत्तलखाना बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी कत्तलखाना बंद झाल्याचे जाहीर केले. पंचायत समिती सभेतही कत्तलखाना बंद करण्यास यश आल्याचे सांगण्यात आले. मात्र शुक्रवारी कत्तलखाना नेहमीप्रमाणेच सुरू होता.
चौकट
स्वच्छता निरीक्षकांनाही ठेकेदाराने राेखले
कत्तलखान्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना ठेकेदाराने आत प्रवेश देण्यास नकार दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर स्वच्छता निरीक्षकांनी आत जाऊन पाहणी केली, असता तेथे जनावरे कापण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरु होते. कत्तलखाना बंदचे आदेश कोणीही दिलेले नाहीत. कत्तलखाना बंद करावयाचा असल्यास संबंधितांनी न्यायालयात जावे असेही उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.