आबा, आज तुम्ही हवे होता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:49 PM2019-09-01T23:49:49+5:302019-09-01T23:49:55+5:30
- वसंत भोसले सांगली जिल्ह्याने अनेकवेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी आज कोणीही हयात नाही. पुढे अनेकजण या नेतृत्वाची ...
- वसंत भोसले
सांगली जिल्ह्याने अनेकवेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी आज कोणीही हयात नाही. पुढे अनेकजण या नेतृत्वाची परंपरा चालवत जातीलदेखील. मात्र, या परंपरेतील आता तरी अखेरचा दुवा आर. आर. आबा पाटील यांच्या रूपाने निघून गेला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगणारे महाराष्ट्राच्या चांदापासून बांद्यापर्यंत कार्यकर्ते भेटतील, अधिकारी असतील, प्राचार्य असणार, पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, आदी सर्वच क्षेत्रांतील माणूस भेटेल. मी मुद्दाम माणूस भेटेल, असे म्हणतो आहे; कारण माणूस शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एका सामान्य कुटुंबातील, छोट्या गावातील आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता तयार केली. आपल्या आजूबाजूचा कमकुवतपणाच त्यांनी सामर्थ्य ठरविले, त्यालाच शक्तिमान केले.
येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. याच मावळत्या सभागृहाचे तुम्ही सदस्य होता. भाजप-शिवसेनेची युती प्रथमच झाली नव्हती आणि शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला होता. सध्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदावर निवड झाली होती. त्याप्रसंगी केलेले आपले भाषण नुकतेच यूट्युबवर ऐकले. विरोधी पक्षनेत्याला शुभेच्छा देता-देता त्यांनाही आणि सत्तारूढ भाजपलादेखील शालजोडीतून तुम्ही हाणत होता. तसा विषय काहीच नव्हता. निवड होताच शुभेच्छा देण्याचा तो प्रसंग होता. मात्र, राजकीय बाजू तुम्ही ठामपणे मांडून या सभागृहाच्या पाच वर्षांचा कालखंड कसा असेल, याची झलकच दाखवून देत होता. त्यामुळेच आज वाटते की, भाजप सरकार सत्तेवर असताना विरोधी पक्षाच्या बाकावर आज तुम्ही असायला हवे होता.
हा माणूस सामर्थ्यवान होत असतानाच आपल्यातून निघून गेला. आमच्या एका ज्येष्ठ मित्रवर्यांनी त्यांचे खूप सुंदर वर्णन केले. एक सप्टेंबरला तासगावच्या बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या आबांच्या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. याच बाजार समितीमधून आबांनी तासगाव मतदारसंघाचा कारभार पाहिला. जिल्ह्याचे राजकारण पाहिले आणि राज्य नेतृत्वाकडे झेप घेतली. ते म्हणतात, ‘आर. आर. आबा यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे कुटुंब जरी मराठा समाजातील असले तरी पाटीलकीच्या किंवा भाऊबंदकीच्या तगडेबाज पठडीतले ते नव्हते. सहकारी साखर कारखाना नव्हता. अभियांत्रिकी किंवा इतर शिक्षण संस्था पाठीशी नव्हत्या. लौकिक अर्थाने कोणतेही राजकीय पाठबळ नव्हते. हा एकप्रकारे राजकारणात यशस्वी होण्यासाठी कमकुवतपणा समजला जातो. हा कमकुवतपणाच राजकीय सामर्थ्यात रूपांतर करण्याची कल्पनाशक्ती मात्र आबांकडे अफाट होती.
अकरा वर्षांच्या जिल्हा परिषद सदस्याच्या राजकीय अनुभवातून १९९० मध्ये तासगाव या अत्यंत संवेदनशील, पै-पाहुण्यांचे राजकारण करणाऱ्या मतदारसंघाच्या मैदानात ते उतरले, निवडूनही आले. आमदार होताच महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात आजवर एकानेही प्रयोग केला नसेल, असा त्यांनी प्रयोग केला. तासगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत असलो तरी ते संपूर्ण महाराष्ट्राचे सभागृह आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे, हे त्यांनी जाणले. आमदारकीच्या पहिल्याच वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी सर्व जिल्ह्यांत जाऊन तेथील जाणकार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासक, आदींच्या भेटी घेऊन प्रश्न समजून घेतले. तेथील पीक-पाणी यांचा अभ्यास केला. त्या-त्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये समजून घेतली. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे विशेष प्रश्नही जाणले. शेतीचा प्रकार, पीक पद्धती, सिंचनाची स्थिती, रोजगारनिर्मिती, औद्योगिकरण, शहरीकरण, सांस्कृतिक संदर्भ, सामाजिक रचना, आदी सर्वकाही समजून घेतले. मला वाटते, आबा हे एकमेव आजवरचे महाराष्ट्रातील आमदार होऊन गेले असतील की, त्यांनी संपूर्ण राज्य समजून घेऊन विधिमंडळाचे राजकारण हाताळले.
त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या काळात काँग्रेस पक्षाचे सरकार होते. त्यामुळे ते सत्ताधारी बाकावर बसले होते. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर जोशी, निहाल अहमद, श्रीपतराव शिंदे, के. एल. मलाबादे, दि. बा. पाटील, गणपतराव देशमुख, संभाजी पवार, आदी दिग्गज लोकप्रतिनिधी विरोधी बाकावर होते. सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांना सरकारच्या उणिवा दाखविण्यास, समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्यास मर्यादा येतात. मात्र, आबा सत्तारुढ पक्षाच्या बाजूला बसूनसुद्धा विधिमंडळ सदस्यांना उपलब्ध असणाºया सर्व आयुधांचा वापर करत होते. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना (बहुधा १९९२चे) नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होते. ते तेवीस दिवस चालले. या तेवीस दिवसांत आबांनी अभ्यासपूर्ण मांडलेल्या सत्तावीस लक्षवेधी सूचना लागल्या होत्या. त्यावर चर्चा झाली. अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी करून घेतले. हा एक पराक्रमच होता. वास्तविक ‘लक्षवेधी सूचना’ या आयुधाचा वापर विरोधी पक्षातील सदस्य अधिक करतात. मात्र, आबांच्या या पराक्रमाने त्यांना ‘लक्षवेधीकार’ म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यांच्या मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते प्रेमापोटी मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांवर ‘लक्षवेधीकार’ लिहून अभिमानाने मिरवत होते.
हा पराक्रम कसा केला? हा सवाल सांगलीच्या पत्रकारांशी गप्पा मारताना ते म्हणाल्याचे आजही मला आठवते. ते म्हणायचे, ‘विधिमंडळाने उपलब्ध करून दिलेली आयुधे हेच माझे भांडवल आहे. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न माहीत असावे लागतात. केवळ आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नावर इतक्या लक्षवेधी मांडता येत नाहीत. अनेक सदस्य आपल्या मतदारसंघाचा विषय असेल किंवा एखादा विषय मंजूर करून घ्यायचा असेल, तर तेवढ्या वेळेपुरतेच कामकाजात भाग घेतात आणि कार्यकर्त्यांची कामे करत मंत्र्यांच्या एका दालनातून दुसºया दालनात येरझाºया मारत असतात. आपण हे कधी केले नाही.’ विधिमंडळाच्या कामकाजाचा पूर्ण दिवस ते सभागृहात हजर असत. पहिल्या दहा वर्षांत ते सदस्यच होते. तिसºया टर्मवेळी मंत्री झाले. या दहा वर्षांची त्यांची हजेरी ९९.५० टक्के होती. विधिमंडळाचे कामकाज चालू असताना चुलतीचे निधन झाले म्हणून एके दिवशी रात्री आपल्या अंजनी गावी पोहोचले. रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तडक मोटारीने मुंबई गाठून दुपारनंतर सभागृहात हजर झाले. तो अर्धा दिवसच ते गैरहजर होते.
आबांनी सत्तेत आल्यानंतर ग्रामीण विकासमंत्री, गृहमंत्री असतानाचे घेतलेले निर्णय महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहेत. त्याची चर्चा करायला नको. आपल्याला मिळालेल्या ग्रामीण विकास खात्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. असंख्य नवीन संकल्पना मांडल्या. उपमुख्यमंत्री असतानादेखील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचार करत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोणत्या विषयात समाजाचे हित आहे, कोणत्या विषयाला जनता पाठिंबा देऊ शकते आणि कोणता विषय माध्यमांमध्ये चर्चेला येऊ शकतो, याची उत्तम जाण त्यांना होती. उत्तम वक्तृत्वशैली होतीच. समोर शेतकरी असो, विद्यार्थी, युवक असोत, महिला असोत की, शहरी माणूस असो त्यांच्या मनातील भावना बोलून प्रश्नांची उकल करत ते उत्तम मांडणी करत होते. त्यामुळे त्यांना प्रसिद्धीसाठी माध्यमांच्या मागे धावण्याची गरज निर्माण झाली नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याकडे धावत असत. गडचिरोलीचा एक चॅनेलचा प्रतिनिधी त्यांचा खास मित्र व्हायचा. सांगलीचे पत्रकार तर मित्रपरिवारच होता. भेट होताच त्यांच्याकडील माहिती समजून घेऊन, समाजातील विविध क्षेत्रांत कोणत्या घडामोडी घडत आहेत, सरकारचे विविध निर्णय तसेच धोरणांवर लोकांचे मत काय आहे, हे पत्रकार मंडळींकडून ते समजून घेत. ती चर्चा अनौपचारिक असे. त्याप्रसंगी सरकारचे कुठे चुकते, याची कबुली द्यायला ते धजावत नसत. त्यातील एक शब्दही माध्यमात येत नसे. ही चर्चा संपल्यावर पत्रकार मंडळी म्हणायची, ‘आबा, आता छापायचे काय, ते बोला.’ आम्हीही कोणते प्रश्न छापण्यासाठी विचारायचे, त्याची सुरुवात करतो. असा सारा हा मामला असायचा. ते मित्रासारखेच वावरायचे. उपमुख्यमंत्र्यांच्या सर्किट हाऊसमधील बेडवर बसून पत्रकार परिषदा होत असत.
आपणास मिळालेली सत्ता, पद किंवा एखादी जबाबदारी ही संधी आहे, असेच म्हणून ते त्याकडे पाहत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची अचानकपणे २००४ मध्ये निवड झाली. त्याचवेळी लोकसभा व पुढे विधानसभा निवडणुका लागल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाध्यक्ष शरद पवार आजारी पडले. मग, या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आबांनी खांद्यावर घेतली. पवारसाहेबांनी त्यांच्यासाठी २१ दिवस खास हेलिकॉप्टरची सोय केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा त्यांनी हाताळली. स्वत:च्या मतदारसंघाकडेही ते फिरकत नव्हते.