आबा, काकांचे गट आमने-सामने
By admin | Published: July 14, 2014 12:22 AM2014-07-14T00:22:50+5:302014-07-14T00:34:45+5:30
तासगाव नगराध्यक्षपद : बुधवारी होणार फैसलो
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीबाबत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. उद्या, सोमवारी अर्ज माघारीचा दिवस आहे. अर्ज माघारीनंतर दि. १६ रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडीमध्ये मैदानात कोण राहणार, हे स्पष्ट होणार आहे.
तासगावच्या नगराध्यक्ष निवडीवरून गेल्या आठ दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील व खा. संजयकाका पाटील या दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष आपल्याच गटाचा व्हावा, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात गृहमंत्री आर. आर. पाटील गटातून शुभांगी साळुंखे यांचा, खा. पाटील गटातून बाबासाहेब पाटील व अविनाश पाटील यांचा, तसेच काँग्रेसचे संजय पवार यांचाही असे अर्ज दाखल झाले आहेत.
उद्या, सोमवारी यामधील कुणाचे अर्ज राहणार, याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. दोन्ही गटाकडून बहुमताचा दावा करण्यात येत आहे. त्यात काँग्रेसचा एकमेव सदस्य असणाऱ्या संजय पवार यांनी अर्ज भरून या निवडणुकीची रंगत वाढवली आहे.
अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत दोन्ही गटाच्या सदस्यांच्या बैठका सुरू होत्या. गृहमंत्र्यांच्या गटातून शुभांगी साळुंखे यांचे नाव निश्चित करून त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला, तर खा. पाटील यांच्या गटातून बाबासाहेब पाटील व अविनाश पाटील या दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून या निवडीबाबतच्या चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यात गृहमंत्री पाटील व खा. पाटील हे दोघेही मतदारसंघात आहेत. या दोघांच्याही संपर्कात यांच्या गटाचे नगरसेवक आहेत. (वार्ताहर)