सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण
By admin | Published: July 16, 2017 11:55 PM2017-07-16T23:55:43+5:302017-07-16T23:55:43+5:30
सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी हरिपूर (ता. मिरज) येथील हॉटेल व्यावसायिक विठ्ठल लक्ष्मण भोसले (वय ३४) यांचे अपहरण करुन, त्यांना खोलीत डांबून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. १४ जुलैला, शुक्रवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी सावकार सागर बाळासाहेब वठारे (रा. कर्नाळ रस्ता, सांगली) याच्यासह तिघांविरुद्ध रविवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विठ्ठल भोसले यांचे सराफ कट्ट्यावर हॉटेल आहे. २०१५ मध्ये त्यांनी सागर वठारे याच्याकडून महिन्याला दहा टक्के व्याजाने ९० हजार रुपये घेतले. आतापर्यंत त्यांनी व्याजापोटी एक लाख ६२ हजार रुपये दिले आहेत. तरीही अजून मुद्दल व व्याज असे एकूण साडेचार लाख रुपये देणे लागतोस, असे म्हणून त्याने भोसले यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. सर्व पैसे व्याजासह परत केल्याचे भोसले सांगत
होते. पण वठारे पैसे वसुलीसाठी धमकावत होता. १४ जुलैला तो वसुलीसाठी
त्यांच्या हॉटेलमध्ये गेला होता. पण भोसले यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे वठारेने त्याचा साथीदार कांच्या (पूर्ण नाव निष्पन्न नाही) व आणखी एक अनोळखी या दोघांच्या मदतीने भोसलेंचे अपहरण
केले. तेथून त्यांना पंचमुखी मारुती रस्त्यावरील सम्राट मटण शॉपसमोरील एका इमारतील नेले. तिथे एका खोलीत कोंडून ठेवून लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. ‘मी पैसे देऊ शकत नाही’, असे भोसले यांनी सांगितले. तरीही वठारे व कांच्या या दोघांनी त्यांना लाथा-बुक्क्या
व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
केली. तसेच सोबतच्या तिसऱ्या अनोळखी संशयिताने त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडून बँक आॅफ इंडियाचे सहा कोरे धनादेश घेऊन त्यावर सह्याही घेतल्या. ‘येत्या पाच महिन्यात पैसे नाही दिलेस, तर तुझ्या वडिलांच्या नावावरील जागा माझ्या नावावर करुन घेणार’, अशी धमकीही वठारे याने दिली.
गेल्या एक महिन्यापासून वठारे हा भोसलेंना धमकावून मारहाण करीत आहे. पण दि. १४ रोजी त्याने फारच त्रास दिल्याने भोसले यांनी शहर पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. वठारे व त्याच्या साथीदारांना अद्याप अटक केलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे तपास करीत आहेत.
वडील, भावाच्या सह्या
वठारे याने पैसे वसुलीसाठी भोसलेंचे वडील लक्ष्मण व भाऊ रमेश या दोघांच्या मुद्रांकावर जबरदस्तीने सह्या व अंगठा घेतला आहे. पाच महिन्यांत साडेचार लाख रुपये दिले नाहीत, तर तो वडिलांच्या नावावरील जागा या मुद्रांकावरील सह्याच्या मदतीने स्वत:च्या नावावर करुन घेणार आहे, तशी त्याने धमकीही दिली आहे.