ट्रकचे टायर फुटल्याने उडी मारून तलाठीने घेतली सुटका करून ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 03:59 PM2020-01-31T15:59:02+5:302020-01-31T15:59:24+5:30
यापैकी एका ट्रक चालकाने अधिकाऱ्यांशी वादावादी करीत मारहाणीचा कांगावा सुरू केला. या प्रकारामुळे पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी एका ट्रक चालकास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर वाळूचा विनाक्रमांकाचा आणखी एक ट्रक तहसीलदार कार्यालयात नेण्यासाठी तलाठी प्रवीण जाधव ट्रकमध्ये बसले.
मिरज : मिरज-कोल्हापूर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री वाळू तस्करांनी तलाठी प्रवीण जाधव यांचे वाळूच्या ट्रकमधून अपहरण केले. तहसीलदार व पोलिसांच्या पाठलागानंतर जयसिंगपूरजवळ ट्रकचे टायर फुटल्याने उडी मारून तलाठी प्रवीण जाधव यांनी उडी मारून सुटका करून घेतली. सुमारे एक तासाच्या अपहरण नाट्यानंतर वाळूच्या ट्रकसह चालकास ताब्यात घेऊन पोलिसात अपहरण व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
गुरुवारी रात्री प्रांताधिकारी समीर शिंगटे कोल्हापूर रस्त्यावरून येत असताना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक दिसून आले. याबाबत त्यांनी सूचना दिल्यानंतर तहसीलदार रणजित देसाई, मंडल अधिकारी श्रीशैल हांगे व तलाठी प्रवीण जाधव, कोल्हापूर रस्त्यावर गेल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेने जाणारे दोन व मिरजेकडे येणारे दोन वाळूचे ट्रक अडविण्यात आले. यापैकी एका ट्रक चालकाने अधिकाऱ्यांशी वादावादी करीत मारहाणीचा कांगावा सुरू केला. या प्रकारामुळे पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी एका ट्रक चालकास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर वाळूचा विनाक्रमांकाचा आणखी एक ट्रक तहसीलदार कार्यालयात नेण्यासाठी तलाठी प्रवीण जाधव ट्रकमध्ये बसले.
मात्र ट्रकचालकाने ट्रक मिरजेकडे न वळविता जयसिंगपूरच्या दिशेने भरधाव वेगात पळविला. यावेळी तहसीलदार व पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केल्यानंतर वाळू तस्कराच्या साथीदारांनी ट्रकमागे आणखी दोन मोटारी लावून तहसीलदार व पोलिसांना पुढे जाण्यापासून रोखले. एका मोटारीने तहसीलदारांच्या मोटारीस धडक दिली.
पळून जाणा-या ट्रकबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरोळचे तहसीलदार व पोलीस पथकानेही ट्रकचा पाठलाग सुरू केला. मात्र वाळू भरलेला ट्रक भरधाव वेगाने जयसिंगपूरवरून इचलकरंजीकडे जात होता. इचलकरंजी रस्त्यावर ट्रकचे मागील दोन्ही टायर फुटल्यानंतरही चालकाने ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रकचा वेग कमी झाल्याने तलाठी प्रवीण जाधव यांनी ट्रकमधून उडी मारून सुटका करून घेतली. पुढे काही अंतरावर चालकाने ट्रक सोडून अंधारात पलायन केले.