अभिजित राऊत जि.प.चे नवे ‘सीईओ’
By Admin | Published: May 9, 2017 12:00 AM2017-05-09T00:00:17+5:302017-05-09T00:00:17+5:30
अभिजित राऊत जि.प.चे नवे ‘सीईओ’
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या बारा दिवसांपासून रिक्त असलेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तळोदा (जि. नंदूरबार) येथील प्रांताधिकारी अभिजित राजेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची वर्षाच्या कालवधितच सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बढतीवर बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेश २६ एप्रिलरोजी आले होते. तेव्हापासून हे पद रिक्त होते. नव्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीबद्दल कोणतेही आदेश नव्हते. त्यामुळे उत्सुकता वाढली होती. सोमवारी ही प्रतीक्षा संपली. राऊत यांची आता नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
राऊत २०१३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले असून, ते मूळचे अकोला येथील आहेत. २०१४-१५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या कालावधित प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांनी सांगलीत काम केले आहे. नंदूरबार येथे काही काळ त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. राऊत यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले असले तरी, ते आठवडाभरात कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी
स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अशी अभिजित राऊत यांची ओळख आहे. त्यांनी दुर्गम भाग असलेल्या नंदुरबारमधील आश्रमशाळांचे प्रश्न मार्गी लावले. जिल्ह्णातील शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क घोटाळ्यासह विहिरींच्या अनुदानातील अपहार शोधून काढून संबंधितांवर गुन्हे दाखल केले. तेथील प्रशासनाला शिस्त लावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.