जगभरातील ५० हजार भाविकांकडून अभिषेक; गोल्डन बुकमध्ये मिरवणुकीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:08 AM2018-02-25T02:08:28+5:302018-02-25T02:08:28+5:30
श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात गेल्या आठ दिवसांत जगभरातून आलेल्या पन्नास हजार भाविकांनी अभिषेक केला आहे. दररोज सहा हजारांहून अधिक भाविक अभिषेक करीत आहेत. या सोहळ्याचा सोमवारी समारोप होणार आहे. चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समारोप कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचे काम सुरू आहे.
सांगली : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात गेल्या आठ दिवसांत जगभरातून आलेल्या पन्नास हजार भाविकांनी अभिषेक केला आहे. दररोज सहा हजारांहून अधिक भाविक अभिषेक करीत आहेत. या सोहळ्याचा सोमवारी समारोप होणार आहे. चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समारोप कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचे काम सुरू आहे.
श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला. मस्तकाभिषेकाचा मुख्य सोहळा १७ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, गेल्या आठ दिवसांत जगभरातील पंचवीस लाख भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. मस्तकाभिषेक सोहळ्यात दररोज भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर अभिषेक केला जात आहे. त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पहाड उभा केला आहे. दररोज चार हजार कळसधारक कुटुंबासह अभिषेकात भाग घेत आहेत. नव्याने बांधलेल्या पहाडावर कलशधारक, त्यांच्या कुटुंबासह सहा हजार भाविक अभिषेकासाठी जात आहेत. या अभिषेकासाठी जगभरातून भाविक दाखल झाले आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, रशिया, दक्षिण अफ्रिका अशा विविध देशांतून आलेल्या भाविकांचाही समावेश आहे.
गोल्डन बुकमध्ये मिरवणुकीची नोंद
महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी श्रवणबेळगोळ येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू व उत्तर भारतातील बाराशेहून अधिक पथकांनी विविध संस्कृतीचे दर्शन घडवले होते. या मिरवणुकीत लाखो लोक सहभागी झाले होते. गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने या मिरवणुकीची दखल घेत सर्वात मोठी व भव्य धार्मिक मिरवणूक म्हणून नोंद केली आहे.
राजनाथ सिंह आज सहभागी होणार
महामस्तकाभिषेक सोहळ्यात रविवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. ते दुपारी दोन वाजता श्रवणबेळगोळमध्ये दाखल होतील.