सांगलीतील अभिषेक कुंटे टोळी हद्दपार, पोलिस अधीक्षकांचे आदेश
By शरद जाधव | Published: July 21, 2023 06:09 PM2023-07-21T18:09:36+5:302023-07-21T18:10:00+5:30
जबरी चोरी, घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत इतर गुन्हे
सांगली : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत इतर गुन्हे करणाऱ्या अभिषेक कुंटे टोळीला दोन वर्षांसाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याबाबतचे आदेश दिले.
अभिषेक दीपक कुंटे (वय २०, रा. बुरूड गल्ली,सांगली), मोसिन मुस्ताक ठाक्कर (२५, रा. शिवशंभो चौक,सांगली), अमन मिरासाब पेंढारी (१९, रा. गवळी गल्ली,सांगली), सरफराज ईस्माइल अत्तार (३९, रा. महात गल्ली, सांगली) आणि करण किशोर ओगानिया (१९, रा. गवळी गल्ली,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
गेल्या वर्षभरापासून या टोळीने संगनमत करून जबरी चोरी, घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणे यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. या टोळीविरोधात शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी कारवाईचा प्रस्ताव दिला होता. त्यावर तपासणी करून सर्वांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.