गर्भपात प्रकरण: मृत गर्भवतीच्या आई-वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:50 AM2024-06-01T11:50:59+5:302024-06-01T11:51:19+5:30

याप्रकरणी सात जणांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल

Abortion case: A case has also been registered against the parents of the dead pregnant woman | गर्भपात प्रकरण: मृत गर्भवतीच्या आई-वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल

गर्भपात प्रकरण: मृत गर्भवतीच्या आई-वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल

सांगली : आळते (ता. हातकणंगले) येथील सोनाली सचिन कदम (वय ३२) हिचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्याच्या प्रकरणी आई-वडील व भावासह सात जणांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल झाला आहे. सांगली शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर शून्य क्रमांकाने तो महालिंगपूर (जि. बागलकोट) पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

मृत सोनालीचे वडील संजय गवळी, आई संगीता गवळी, भाऊ विजय गवळी (रा. दुधगाव, ता. मिरज), डॉ. मारूती बाबासाहेब खरात (रा. कुपवाड), डॉ. कोठीवाले (रा. रामानंदनगर, ता. अथणी), डॉ. कविता बडनेवार (रा. महालिंगपूर) तसेच जयसिंगपूर येथे सोनोग्राफी करणारे डॉक्टर, गर्भलिंग निदान आणि गर्भपातास सहकार्य करणारे संशयित यांच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मृत सोनाली हिचे माहेर दुधगाव (ता. मिरज) आहे. तिचा बेकायदेशीर गर्भपात करताना महालिंगपूर येथे सोमवारी मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिल्यामुळे दाखल्यासाठी मृतदेह घेऊन भाऊ विजय गवळी, डॉ. मारूती खरात हे सांगलीत फिरत होते. तेव्हा शहर पोलिसांनी संशयावरून त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा चौकशीत हा सर्व खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

शहर पोलिसांनी प्राथमिक चौकशीत मृत सोनालीचे गर्भलिंग निदान, गर्भपात याला कारणीभूत असलेले आई, वडील, भाऊ, डॉ. खरात, डॉ. कोठीवाले, डॉ. बडनेवार आणि इतर अशी नावे निष्पन्न केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा गुन्हा महालिंगपूर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. तसेच तेथील पोलिसांना सिव्हिल हॉस्पिटलमधील दाखले व इतर पुरावे देखील दिले. त्यानुसार महालिंगपूर पोलिस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

नातेवाईक ताब्यात

मृत सोनालीचा भाऊ, आई-वडील यांच्यासह कुपवाडमधील डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. महालिंगपूर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे डॉक्टर यांच्यावरही कारवाई होणार आहे.

Web Title: Abortion case: A case has also been registered against the parents of the dead pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.