आबांच्या विचारांचे लोक आमच्यासोबतच

By admin | Published: October 19, 2015 11:04 PM2015-10-19T23:04:13+5:302015-10-20T00:17:37+5:30

स्मिता पाटील : स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना त्यांची जागा कळेल

Abo's thoughts people with us | आबांच्या विचारांचे लोक आमच्यासोबतच

आबांच्या विचारांचे लोक आमच्यासोबतच

Next

प्रवीण पाटील - सावळज--तासगाव - कवठेमहांकाळमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला; मात्र तासगाव-कवठेमहांकाळमधील आर. आर. पाटील आबांच्या विचारांवर प्रेम करणारी जनता आमच्याबरोबर आहे. आबांच्या जिवावर जे मोठे झाले व जे आज फक्त स्वार्थापोटी पक्ष बदलत आहेत, त्यांना येणाऱ्या काळात सूज्ञ जनताच त्यांची जागा दाखवून देईल. तासगाव बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जो इतिहास घडवला, त्याचीच पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत. तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते; मात्र स्मिता पाटील यांनी स्वार्थासाठी पक्ष बदललेल्यांचा खरपूस समाचार घेतला.
दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची होत असलेली ससेहोलपट बघून प्रत्येक क्षणाला आबांची उणीव भासते. सध्याचे सरकार भांडवलदार, उद्योगपतींचे सरकार असून, गोरगरीब शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सोडाच; पण आबांच्या काळात पूर्ण झालेल्या पाणी योजनाही सध्याच्या सरकारच्या कुचकामी धोरणामुळे बंद पडण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी व भांडवलदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना व गोरगरिबांना अच्छे दिन कधी येणार? असा सवाल स्मिता पाटील यांनी केला.
आबांचे सर्व सहकारी, आ. सुमनताई पाटील व सुरेशभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढच्या काळात काम करू, असा विश्वास स्मिता पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कोणतीही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत असेही त्या म्हणाल्या.


मी, सुरेशभाऊ सुमनतार्इंचे कार्यकर्ते
आबांच्यानंतर आमच्या कुटुंबातील तिहेरी नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र मी व सुरेशभाऊ दोघेही सुमनतार्इंचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत असून, आमच्यातील मतभेदाच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. येणाऱ्या काळातही तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातील, असे स्मिता पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना बळ देणार
आबासाहेबांच्या अकाली जाण्याचे दु:ख, संकट व जबाबदाऱ्या या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे, गेले आठ महिने यातून सावरण्यात गेले. मात्र यापुढे शंभर टक्के राजकारणात सक्रिय राहून कार्यकर्त्यांना बळ देऊ, असा विश्वास स्मिता पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Web Title: Abo's thoughts people with us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.