फटाक्यांबाबत संभ्रमाचे ‘भुई’चक्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:08 PM2017-10-11T23:08:51+5:302017-10-11T23:08:51+5:30
अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उच्च न्यायालयाने निवासी क्षेत्रातील फटाक्यांच्या विक्रीला केलेल्या प्रतिबंधानंतर जिल्ह्यात आता फटाके विक्रीसाठी लागणाºया ‘भुई’वरून संभ्रमाचे चक्र स्वत:भोवतीच गरागरा फिरत आहे. महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि फटाके विक्रेते असे सर्वचजण गोंधळात असल्याने शासनाच्या मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्यात सर्वाधिक फटाक्यांची विक्री सांगली, मिरजेत होत असते. येथे दरवर्षी शंभरावर स्टॉल्स असतात. दिवाळीच्या काळात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. गेल्या दोन वर्षात फटाके विक्रेत्यांना महापालिकेने क्रीडांगणे व शाळांची मैदाने स्टॉल्ससाठी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. यंदाही सांगलीत तरुण भारत स्टेडियम आणि नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगण निश्चित केले होते, तर मिरजेत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मिरज हायस्कूलचे पटांगण निश्चित झाले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगली, मिरजेत याबाबत गोंधळ निर्माण झाला. निश्चित झालेल्या जागा व्यावसायिक क्षेत्रात गणल्या जाणार की निवासी क्षेत्रात, याबाबत हा संभ्रम आहे.
फटाके विक्रेत्यांनी बुधवारी महापालिका उपायुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन जागेबाबतची चर्चा केली. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्पष्ट आदेश आल्यानंतर त्यानुसार विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शासनाचे आदेश येईपर्यंत विक्रेत्यांना ‘सलाईन’वर राहावे लागेल.
खरेदीनंतर : चिंतेचा बॉम्ब
दिवाळी तोंडावर आल्याने काही किरकोळ विक्रेत्यांनी अगोदरच फटाक्यांची खरेदी करून ठेवली आहे. इतक्यातच विक्रीसंदर्भातील उच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याने, त्यांच्यावर आता चिंतेचा बॉम्ब पडला आहे. निर्णय घेण्यास प्रशासन आणि शासनाकडून जेवढा विलंब होईल, तेवढा उलाढालीवर परिणाम होणार आहे.
क्षेत्ररचना निश्चित
व्यावसायिक, निवासी, औद्योगिक, शेती, बफर अशा विविध क्षेत्रांबाबतची नोंद महापालिकेकडे आहे. अंतिम झालेल्या विकास आराखड्यांमध्ये क्षेत्रनिहाय रचना दिसून येते. सांगलीतील मुख्य बाजारपेठा या व्यावसायिक क्षेत्रात (कमर्शिअल झोन) येतात. सांगलीचे तरुण भारत क्रीडांगणही याच क्षेत्रात समाविष्ट होते. नेमिनाथनगर येथील क्रीडांगणाबाबत संभ्रम आहे. याठिकाणी निवासी क्षेत्र दिसून येते. तरीही निवासी वापराच्या इमारती या क्रीडांगणापासून दूर आहेत. त्यामुळे या जागेबाबत महापालिकेला मार्गदर्शन घ्यावे लागेल. मिरज हायस्कूलचे क्रीडांगणही व्यावसायिक क्षेत्राजवळच आहे.