अबब! ११ अजस्त्र मगरी, ७५ पिले
By admin | Published: June 15, 2015 12:17 AM2015-06-15T00:17:43+5:302015-06-15T00:17:56+5:30
कृष्णाकाठ मगरमिठीत : भिलवडी ते आमणापूरच्या नदीकाठावरील स्थिती
भिलवडी : तीन महिन्यांपासून मगरीने माणसांवर सुरू केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड दहशतीखाली वावरणाऱ्या कृष्णाकाठाला रविवारी आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी व आमणापूर येथील कृष्णा नदीकाठावर ७५ मगरीची पिल्ली सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून वनविभागाने सुरू केलेल्या सर्व्हेच्या प्राथमिक फेरीमध्ये अंकलखोप, भिलवडी, औदुंबर, धनगाव ते आमणापूर गावच्या नदी किनाऱ्यालगतच्या नदीपात्रात ११ अजस्त्र मगरी असल्याचेही निष्पन्न झाल्याने कृष्णाकाठी पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भिलवडी येथील कृ ष्णा नदीकाठावर असलेल्या पाणंद रस्ता परिसरातील शिवाजी लिफ्टच्या जॅकवेलजवळ असणाऱ्या यादव मळीमध्ये मगर दिसली. शेतात काम करणारे शेतकरी शशिकांत यादव हे नदी किनारी गेले असता, पाण्यात पन्नासावर मगरीची पिल्ली तरंगत असल्याचे दिसले. त्यांच्यासोबत मोठी मगर होती.
आसपास माणसे दिसली किंवा एखादे जनावर दिसले तर, मगर आक्रमक होत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. पिलांना सोडून ही मगर दुसरीकडे कोठेच जात नसल्याची माहिती पाहणारे नागरिक देत आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आमणापूर येथील श्रीराम जॅकवेलजवळ सतीश माळी यांच्या पोटमळीमध्ये सहा फुटलेली अंडी आढळून आली. मगरीने ही अंडी फोडून त्यातून जन्माला आलेली सहा पिले नदीपात्रामध्ये ओढून नेताना शेतकऱ्यांनी पाहिली आहे. ही मगर अंदाजे बारा फूट लांबीची होती. ही पिल्ली सरड्याच्या आकाराएवढी असल्याची माहिती जॅकवेलचालक विष्णू बापू पवार यांनी दिली.
यापूर्वी २७ मे रोजी भिलवडी येथील पुलाजवळील नदीकाठावर मगरीची अंडी व पिले नागरिकांच्या दृष्टीस पडली होती. या ठिकाणी मासेमारी करण्यास गेलेल्या अशोक नलवडे या मच्छिमारावर संतापलेल्या मगरीने हल्ला चढवून जखमी केले होते. कृ ष्णा नदीकाठावर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या मगरींच्या हल्ला सत्रानंतर वनविभागाने आमणापूर ते सांगलीदरम्यान वनपाल व वनसंरक्षकांचा खडा पहारा तैनात केला आहे. मगरींचा प्रजनन कालावधी सुरू असून, ज्या ठिकाणी अंडी व पिले आढळतात, त्या ठिकाणी नागरिकांना पाण्यात न जाण्याबाबत आमणापूर येथील वननिरीक्षक तानाजी माळी यांनी आवाहन केले आहे.
वनविभागाकडून मगरींची गणती
मुंबई येथील खास पथकांकडून तीन बोटींतून तीन स्वतंत्र पथकांनी सांगली ते आमणापूरदरम्यान कृ ष्णाकाठाची पाहणी करून खास दुर्बिणीचा वापर करून मगरींची गणती केली आहे. आमणापूर, धनगाव, औदुंबर, अंकलखोप या गावांदरम्यान प्रथमदर्शनी पाहणीत ११ मोठ्या मगरी, तर १९ पिल्ली आढळून आली असून, अंतिम गणतीनंतरच मगरींची नेमकी संख्या समजणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात.