रसिकतेचा अचूक ठाव क्रांती घडवू शकतो: पायल पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:26 PM2017-11-04T23:26:48+5:302017-11-04T23:34:34+5:30
मराठी रंगभूमी दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग यादिवशी १८४३ मध्ये झाला.
मराठी रंगभूमी दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग यादिवशी १८४३ मध्ये झाला. अनेक दिग्गज नाटककार, तंत्रज्ञ, लेखक, कलाकार या रंगभूमीने घडविले. आजही घडत आहेत. सुवर्णकाळा-सोबतच कालानुरुप अनेक अडचणी, आव्हानेही या प्रवासात आली. इतिहासाचे पाईक होतानाच आधुनिकतेचे बोट धरून नवी पिढी रंगभूमीच्या सेवेत गुंतली आहे. याच नव्या पिढीत पायल पांडेसारखीही गुणी कलाकार घडत आहे. नुकतीच तिची नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा या देशपातळीवरील सर्वोच्च संस्थेत निवड झाली. मराठी रंगभूमी, त्यात होणारे बदल, आव्हाने अशा अनेक गोष्टींबद्दल तिच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न : मराठी रंगभूमी आणि अन्य रंगभूमीत काय फरक जाणवतो?
उत्तर : मराठी रंगभूमी ही सर्वात जास्त प्रभावी आहे. कारण याठिकाणी अजूनही नवे नाटककार घडत आहेत. चांगले लेखकही घडत आहेत. नव्या संहितांचा विचार करता मराठीतच याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्टÑात नाट्य व एकांकिका स्पर्धांची संख्याही अधिक आहे. स्पर्धात्मक पातळीवर अत्यंत कस लागून कलाकार घडत असतात. बंगाली आणि कन्नड रंगभूमीवरही नवनवे प्रयोग घडत असले तरी, मराठीचा प्रभाव सर्वाधिक जाणवतो. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये शिकत असताना याठिकाणीही मराठी कलाकाराकडे पाहण्याचा अन्य भाषिक कलाकारांचा दृष्टिकोनही तसाच आदरयुक्त आहे. साहित्यिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट दर्जा मराठी रंगभूमीने जपला आहे.
प्रश्न : मराठी नाटकांचा कल अर्थपूर्ण विषयांकडे अधिक असल्याचे जाणवते का?
उत्तर : अर्थपूर्ण नाटकांत मराठी रंगभूमीवरचे प्रयोग सुंदरच आहेत. तरीही करमणुकीच्या बाबतीत सध्या गल्लत केली जाते. करमणूक म्हणजे केवळ विनोद असाच अर्थ घेतला जातो. अनेकदा रहस्यमयी कथांमधूनही करमणूक होत असते. माणसाच्या वेगवेगळ््या भावभावनांना स्पर्श करणारे कथानकही करमणूक करून जाते. त्यामुळे करमणूक या विषयाची व्याप्ती मोठी आहे. आपण करमणुकीला एका चौकटीत बांधता कामा नये.
प्रश्न : तरीही विनोदी ढंगाने जाणारी नाटके, व्यावसायिक नाटके आणि अर्थपूर्ण, गंभीर विषयांवरील नाटकांच्या प्रेक्षकवर्गाची तुलना केली, तर हा फरक स्पष्टपणे जाणवतो. तुम्हाला काय वाटते?
उत्तर : निश्चितच हा फरक जाणवत होता, पण आता अर्थपूर्ण व गंभीर विषयांना पसंती देणाराही प्रेक्षक घडत आहे. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा अंदाज घेत नाट्यसंहितांचा जन्म आणि त्याचे सादरीकरण झाल्यास निश्चितच नाटकाकडे प्रेक्षकांचा ओढा अधिक वाढेल. त्यासाठी त्यांच्या रसिकतेचा ठाव घेणे महत्त्वाचे आहे. असे प्रयत्न आता घडायला हवेत. प्रेक्षकांना जे हवे ते द्यायला हवे. तसे काहीप्रमाणात घडत असले तरी, त्यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.
प्रश्न : चित्रपट, त्यामध्ये होत असलेली तांत्रिक प्रगती आणि प्रेक्षकांचा या सर्व माध्यमांकडे वाढलेला कल पाहता नाट्यगृहात प्रेक्षकांना खेचणे सहजसाध्य वाटते का?
उत्तर : नाही. इतकी सहजसाध्य ही गोष्ट वाटत नाही. तरीही तंत्रज्ञाच्या पातळीवर नाटकांनीही प्रगत व्हावे, असे माझे मत आहे. कारण अभिनय, संहिता आणि सादरीकरणात आपण दर्जेदारपणा सांभाळत असलो तरी, दृष्य स्वरुपात आपल्याला तंत्रप्रगत व्हायलाच हवे. तंत्रज्ञानातील नवे बदलही तितकेच महत्त्वाचे आहेत. यासाठीही प्रेक्षकांच्या अभिरुचीचा अभ्यास करायला हवा. मी याबाबत आशावादी आहे. तंत्रांच्या पातळीवरही भविष्यात मराठी रंगभूमी अधिक प्रगत आणि इतिहास घडविणारी ठरेल.
प्रश्न : चांगले कलाकार, चांगले तंत्रज्ञ हे विषय पुन्हा अर्थकारणाशी निगडीत आहेत. मग या गोष्टी कशा शक्यत आहेत?
उत्तर : चित्रपटांप्रमाणेच जर मराठी नाटकांना चांगले निर्माते भेटायला सुरुवात झाली, तर कलाकार आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर आपण नक्कीच सक्षम होऊ शकतो. आणि हे घडू शकते.
- अविनाश कोळी, सांगली