एमबीबीएस, दंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विराम; सहा महिने प्रक्रिया रेंगाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:44 PM2024-11-06T15:44:06+5:302024-11-06T15:45:40+5:30
आयुर्वेदची अंतिम टप्प्यात
सांगली : देशात ५ मे २०२४ ‘नीट’ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया मंगळवारी ५ नोव्हेंबरला संपुष्टात आली. तब्बल सहा महिने प्रक्रिया रेंगाळल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षाला विलंब झाला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात प्राध्यापक व विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम पूर्ण करताना कसरत होण्याची चिन्हे आहेत.
यंदा ४ जून २०२४ रोजी नीट परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर पेपरफुटी, परीक्षेतील गैरव्यवहार, चुकीचे बोनस गुण देणे यामुळे नीट २०२४ची परीक्षा ही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला नीट परीक्षा निकाल तीन वेळा बदलणे भाग पडले. त्यामुळे देशपातळीवरील आणि राज्य पातळीवरील सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला. शेवटी मंगळवारी तब्बल सहा महिन्यांनी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समाप्त झाली.
आयुष कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू असून, ती २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. नीट परीक्षेचा गोंधळ, लांबलेली प्रवेश प्रक्रिया आणि वाढलेले मेरिट यामुळे ही प्रक्रिया वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक सर्वच पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरली. यंदा नवीन आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून ८००, तर एका खासगी महाविद्यालयातून ५० जागा वाढल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला. तरीही गतवर्षीपेक्षा यंदा मेरिट वाढल्याने अनेक विद्यार्थ्यांना इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागला, तर काहींना पुढच्या वर्षीच्या नीटची फेरपरीक्षा देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
फी सवलतीचा परिणाम
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कट ऑफ ५० ते ६० गुणांनी, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा सुमारे ६५ ते ७१ गुणांनी वाढला. मुलींना १०० टक्के फी माफीच्या सवलतीचा परिणाम यावर्षीच्या खासगी महाविद्यालयांचा कट ऑफ वाढण्यावर झाला. यावर्षी मराठा समाजाला दिलेले एस.ई.बी.सी. प्रवर्गाच्या आरक्षणामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला.