राेपवाटिकांमुळे कृषी क्षेत्राच्या प्रगतीला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:26+5:302021-03-28T04:24:26+5:30
मिरज, वाळवा तालुक्यात तयार झालेल्या रोपवाटिकांच्या पट्ट्याची देशभरात ख्याती आहे. मिरज पूर्व भागामध्ये भाजीपाल्याच्या रोपवाटिका दिसतात. उसाच्या तसेच फळबागांच्या ...
मिरज, वाळवा तालुक्यात तयार झालेल्या रोपवाटिकांच्या पट्ट्याची देशभरात ख्याती आहे. मिरज पूर्व भागामध्ये भाजीपाल्याच्या रोपवाटिका दिसतात. उसाच्या तसेच फळबागांच्या रोपवाटिकाही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. मिरजेच्या दुधगाव परिसरात तयार झालेल्या उसाच्या राेपांना अगदी आंध्रप्रदेश, तामिळनाडूपर्यंत मागणी आहे. मालगाव (ता. मिरज) येथील वाघमाेडे नर्सरीत भाजीपाल्याच्या राेपांवर संशाेधन हाेते. येथे तयार झालेल्या विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या राेपांना चांगली मागणी आहे.
आष्टा येथील सावंत नर्सरीही गेल्या ४५ वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये लाेकप्रिय आहे. या नर्सरीचे संचालक महादेव सावंत सांगली जिल्हा गुलाब उत्पादक संघाचे नऊ वर्षे अध्यक्ष हाेते. संशाेधनवृत्ती जाेपासत त्यांनी आपल्या राेपवाटिकेमध्ये अनेकविध प्रयाेग केले. डच गुलाब पहिल्यांदा त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आणला. पांढऱ्या रंगाचा झेंडूही त्यांनीच पहिल्यांदा येथे आणला; पण त्याचे मार्केटिंग हाेऊ शकले नाही. सध्या सिडलेस’ पेरूवर त्यांचे संशाेधन सुरू आहे. या पेरूचे एक झाड सध्या त्यांच्या संग्रहात आहे. या झाडाला काही दिवसांपूर्वी एकमेकांना जाेडलेला पेरू लागला हाेता. याचे काप घेतले असता, त्यामध्ये एकही बी नव्हती. पुन्हा आणखी एक फळ असेच मिळाले. सध्या त्याचा संकर करून ‘सीडलेस’ पेरू तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आष्टा परिसरात देवराज, विकास, मलमे, डांगे, सूर्या, राया, खबिले आदी राेपवाटिका शेतकऱ्यांमध्ये प्रसिध्द आहेत. येथील मिरची, वांगी, टाेमॅटाेच्या राेपांना चांगली मागणी आहे. गेल्या काही वर्षांत ऊस उत्पादक शेतकरीही उसाच्या तयार राेपांना प्राधान्य देत आहे. यामुळे उसाच्या राेपांवरही विविध राेपवाटिकांमध्ये प्रयाेग सुरू असतात. कुंडल येथील क्रांती साखर कारखान्याच्या राेपवाटिकेने ‘ना नफा ना ताेटा’ तत्त्वावर शेतकऱ्यांना ऊस राेपे पुरविण्याचे धाेरण राबविले आहे.
————————-
- दत्तात्रय शिंदे
फाेटाे : २७ दत्ता १..२..३