कोरोनामुळे थंडावलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीतील व्यवहारांना पुन्हा गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:03 PM2021-11-18T13:03:41+5:302021-11-18T13:04:27+5:30
शरद जाधव सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून थंडावलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीतील व्यवहारांनी पुन्हा गती पकडली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ...
शरद जाधव
सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून थंडावलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीतील व्यवहारांनी पुन्हा गती पकडली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात खरेदीसह नोंदणीचे प्रमाण जास्त आहे. दिवाळीच्या तोंडावर गेल्या महिन्यात ७६२ दस्त नोंदणी झाल्याने व्यवहार वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही गेल्यावर्षी कोरोनाचा कालावधी असतानाही जास्त नोंदणी झाल्या होत्या.
उपनिबंधक कार्यालयात जमीन, प्लॉट, फ्लॅट खरेदी विक्रीसह कर्जासाठीचे दस्तही तयार होतात. यासाठी सांगलीतील कार्यालयात नेहमीच गर्दी असते. कोरोनामुळे गेल्यावर्षी या व्यवहारांवर परिणाम झाला होता. तरीही पाचशेहून अधिक नोंदणी झाल्या होत्या. यावर्षीच्या सुरूवातीपासूनच व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली त्यामुळे व्यवहारातही हळूहळू का होईना वाढ होत आहे.
महसुलात नियमांचा अडसर
शासनाने जुलै महिन्यात तुकडे बंदीविषयक एक शासन निर्णय घेतल्याने महसुलाच्या संकलनास अडचणी आल्या. अगदी नोंदणी सातशेवर असल्या तरी त्यातील सर्वाधिक नोंदणी या कर्जप्रकरणाशी संबंधित आहेत. जमिनीचे तुकडे बंदीविषयक आदेश मागे घेतल्यास महसूल वाढण्यास मदत होणार आहे.
फ्लॅट खरेदीला सर्वाधिक पसंती
- नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांपैकी अनेकांनी फ्लॅट खरेदीसच पसंती दिल्याचे चित्र होते. दिवाळीमुळे यात वाढ झाली.
- महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आल्याने गेल्या महिन्यात नोंदणीसाठी गर्दी होती.
कार्यालयात गर्दी
- सांगलीतील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपनिबंधक कार्यालय आहे. या ठिकाणी सकाळपासून नोंदणी पूर्ण होईपर्यंत गर्दी कायम असते.
- खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबरोबरच बँकविषयक दस्ताऐवजही याच ठिकाणी होत असल्यानेही गर्दी होत असते.
नागरिकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि त्याच्या प्रक्रियेस प्रतिसाद मिळत आहे. अजूनही व्यवहार पूर्ववत झाल्यानंतर नोंदणीचे प्रमाण वाढणार आहे. - राहुल हांगे, अधिकारी
मालमत्ता खरेदी-विक्री
ऑक्टोबर २०१९ - ५८०
ऑक्टोबर २०२० - ९१९
ऑक्टोबर २०२१ - ७६२