सांगली: वाढदिवसादिवशीच अपघाती मृत्यू, ट्रॅक्टरच्या धडकेत माळवाडीच्या माजी उपसरपंचासह दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:59 PM2022-10-19T17:59:02+5:302022-10-19T18:26:45+5:30
दिवसभर मित्रपरिवार त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत होता. अचानक रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला
पलूस : माळवाडी (ता. पलूस) येथे ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता हा अपघात घडला. माळवाडीचे माजी उपसरपंच अजिंक्यकुमार वसंत कदम (वय २९) व अनिकेत संजय माने (वय २८, दोघेही रा. माळवाडी) अशी मृतांची नावे आहेत. मृत अनिकेत याचा मंगळवारीच वाढदिवस होता. वाढदिनीच त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता.
माळवाडीचे माजी उपसरपंच असलेले अजिंक्यकुमार कदम व अनिकेत माने दोघेही अनिकेत याच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीक्यू ८३८७) कामानिमित्त पलूसला गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास ते माळवाडीस परतत होते. आमणापूरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज त्यांना आला नाही. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दोघेही दुचाकीसह उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निपचित पडले. नागरिकांनी तात्काळ दोघांनाही पलूस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच पलूस पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत अनिकेत याचा मंगळवारीच वाढदिवस होता. दिवसभर मित्रपरिवार त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत होता. अचानक रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला. रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरा अपघाताची नोंद पलूस पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.