मुस्लिम मते जयंतरावांच्याच पाठीशी
By admin | Published: November 15, 2015 10:56 PM2015-11-15T22:56:06+5:302015-11-16T00:11:40+5:30
एमआयएमला टोला : राष्ट्रवादीचे इस्लामपुरातील मुस्लिम नेते सरसावले
अशोक पाटील ---इस्लामपूर--गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ इस्लामपूर शहरावर माजी मंत्री, आमदार जयंत पाटील (राष्ट्रवादीचे) यांचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आपण या मतदारसंघात तळ ठोकू, असा इशारा एमआयएमच्या दोन आमदारांनी दिला आहे. यावर शहरातील राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना एमआयएम पक्षाची खिल्ली उडविली. कोणत्याही परिस्थितीत जयंत पाटील यांच्या मुस्लिम वोट बँकेला कोणीही धक्का लावू शकणार नसल्याचा प्रतिटोला त्यांनी दिला.माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, नगरसेवक पीरअल्ली पुणेकर आणि शहराच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोझा किणीकर म्हणाल्या, इस्लामपूर शहर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. सर्व हिंदू बांधवांचा दिवाळी सण संपल्यानंतर संभूआप्पा बुवाफन या दोन समाजातील गुरु-शिष्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. इस्लामपूर शहरात कधीच जातीय दंगली झाल्या नाहीत. परंतु आता जातीच्या नावाखाली मते मागणाऱ्या नेत्यांची संख्या वाढू लागली आहे. याचाच फायदा काही मुस्लिम नेत्यांनी उठविला आहे.शहरातील काही मुस्लिम नेते जातीच्या नावाखाली एमआयएमच्या रूपाने राष्ट्रवादी म्हणजेच जयंत पाटील यांच्याविरोधात बीज पेरत आहेत. परंतु जयंत पाटील यांची असलेली मुस्लिम वोट बँक आजही आणि येथून पुढेही सुरक्षितच राहणार असल्याचे शहरातील बहुतांशी राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
इस्लामपूर नगरपरिषदेचा राजकीय इतिहास तपासला असता, नगराध्यक्षपदी युसूफ मोमीन (सावकार), मुनीर पटवेकर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच उपनगराध्यक्षपदी हामजाशेठ दिवाण यांना संधी दिली होती. तसेच बहुतांशी मुस्लिम नेत्यांना नगरसेवक पदाची संधी देण्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मुस्लिम मतांच्या ताकदीवर हवा केलेल्या एमआयएम पक्षाला कितपत यश मिळणार, हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
जयंत पाटील हे आमचे नेते आणि आदर्श आहेत. त्यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. मुस्लिम समाजातील नेते त्यांचे खंदे समर्थक आहेत. जयंत पाटील समर्थकांना पदाचे आमिष दाखवले तरी, जातीयवादी संघटनेला ते बळी पडणार नाहीत. जयंत पाटील म्हणजेच राष्ट्रवादीची मुस्लिम वोट बँक सुरिक्षत राहील, याची मी खात्री देते.
- रोझा किणीकर,
शहराध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस.
मुस्लिम नेत्यांमध्ये कार्यालयावरुन नाराजी
मिरज, सांगली वगळता इस्लामपूरसारख्या निमशहरी भागात एमआयएमचे जिल्हा कार्यालय सुरु केल्यामुळे मिरज शहरातील काही मुस्लिम नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्हाध्यक्षांनी या पदाचा सहा महिने कारभार सांभाळून दाखवावा, अशी चर्चा शनिवारी झालेल्या सभेवेळी सुरु होती.