Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड
By शीतल पाटील | Published: May 2, 2023 07:25 PM2023-05-02T19:25:20+5:302023-05-02T19:25:38+5:30
पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता.
सांगली : चारित्र्याच्या संशयावरून दगड डोक्यात घालून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी पती रामचंद्र विठोबा हाके (रा. वाघमोडेनगर, कुपवाड) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीस आर. एन. माजगावकर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती ए. व्ही कदम यांनी काम पाहिले.
याबाबत माहिती अशी की, रामचंद्र हाके हा पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. २९ जुलै २०२० रोजी रात्री साडेअकरा वाजता त्याने दरवाजा अडविण्यासाठी ठेवलेला दगड टाॅवेलमध्ये बांधून पत्नीच्या डोक्यात वार केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्यादिवशी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांत आरोपी हाकेविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात १७ साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा, फिर्यादीचा जबाब, साक्षीदारांचे टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रामचंद्र हाके याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात पोलिस हवालदार अशोक कोळी, सहाय्यक निरीक्षक अशोक तुराई, वंदना मिसाळ, रेखा खोत, सुप्रिया भोसले यांनी सहकार्य केले.