अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा
By शरद जाधव | Published: March 29, 2023 08:18 PM2023-03-29T20:18:24+5:302023-03-29T20:18:32+5:30
आळते येथील आरोपी : जिल्हा न्यायालयाचा निकाल
सांगली : अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आमिषाने पळवून नेत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सुनील सुभाष जाधव (रा. आळते ता. तासगाव) असे आरोपीचे नाव आहे. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.
खटल्याची अधिक माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील एका गावातील पीडित मुलगी ही संध्याकाळी घरातून बाहेर पडली ती आली नव्हती. याबाबत तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध करूनही ती न मिळाल्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या दरम्यान आरोपी सुनील जाधव याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व तिच्यावर ठिकठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. गुन्ह्याचा सखोल तपास करून सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांनी आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
या खटल्यात कुंडल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी युवराज सरनोबत, पोलिस कर्मचारी संभाजी शिंदे, विनोद कांबळे, वंदना मिसाळ, गणेश वाघ, सुप्रिया भोसले, सुनीता आवळे यांचे सहकार्य मिळाले.
गंभीर गुन्ह्याची दखल
आरोपी स्वत: विवाहित असतानाही त्याने हा गुन्हा केला होता. सरकार पक्षातर्फे हे सिद्ध करण्यात आले. शिक्षा सुनावत असताना न्यायाधीशांनी अशाप्रकारचे गुन्हे पुन्हा करण्याचे धाडस समाजात होऊ नये यासाठी कडक शिक्षा देणे आवश्यक आहे, असे नमूद केले.