नेवरी खूनातील आरोपीला जन्मठेप; सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By शीतल पाटील | Published: November 10, 2023 08:12 PM2023-11-10T20:12:46+5:302023-11-10T20:12:57+5:30
आरोपीस अटकाव करणाऱ्या संदिप याच्यावरही आरोपीने चाकूने वार केले. या घटनेनंतर तो पसार झाला.
सांगली : कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे एकाचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी राजू उर्फ राजेंद्र मधुकर करांडे (वय ४७, रा. उमरकांचन वसाहत, नेवरी, ता. कडेगाव ) याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. एम. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी, आरोपी राजेंद्र करांडे याचे अनैतिक संबंध होते. याला मयत प्रदीप शिंदे आणि फिर्यादी संदीप शिंदे यांनी विरोध केला होता. करांडे याला समजावून सांगण्यासाठी त्यांनी बोलविले होते. यावेळी आरोपी राजेंद्र याने प्रदीप यांच्या छाती, पोट आणि मानेवरती चाकूने सपासप वार केले. यामध्ये प्रदीप गंभीर जखमी झाला. आरोपीस अटकाव करणाऱ्या संदिप याच्यावरही आरोपीने चाकूने वार केले. या घटनेनंतर तो पसार झाला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने प्रदीप शिंदे यांचा मृत्यू झाला तर अन्य दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या खटल्यात जखमी संदिप शिंदे, शारदा शिंदे, तपासी अंमलदार डी. एस. गोसावी, डॉ. सुरेखा गावडे, डॉ. रोहन शिरोडकर आदींच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरुन न्यायमूर्ती एम. एम. पाटील यांनी आरोपी राजेंद्र करांडे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच भा.द.वि. कलम ३२६ अन्वये दोषी धरुन दोन वर्षे सश्रम कारावास आणि कलम ३२३ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास अशी त्यास शिक्षा ठोठावली. खटल्याच्या कामकाजात कडेगाव पोलीस ठाण्याचे युवराज सूर्यवंशी, पैरवी कक्षातील अशोक तुराई, शरद राडे, वंदना मिसाळ यांनी मदत केली.