Sangli: अश्लील फोटो व्हायरलची धमकी; गुन्ह्यातून सुटलेल्या आरोपीचा पीडितेवर पुन्हा लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:43 PM2024-09-13T15:43:54+5:302024-09-13T15:44:12+5:30
कवठेएकंदच्या तरुणावर गुन्हा
सांगली : पीडित तरुणीने दाखल केलेल्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तिला धमकावून लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडितेने कोणाबरोबरही लग्न करू नये अन्यथा पतीला अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर पीडित तरुणीने संशयित मोईन सिराज नदाफ (रा. कवठेएकंद, ता. तासगाव) याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यातील तरतुदीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरज तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणीच्या दुबळेपणाचा फायदा उठवून संशयित मोईन नदाफ याने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्या गुन्ह्यात मोईन याला अटक झाली. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा पीडितेचा पाठलाग सुरू केला. पीडिता मार्च २०२४ मध्ये खरेदीच्या निमित्ताने सांगलीत आल्याचे समजताच मोईन याने तिला गाठले. ‘तू माझ्यावर गुन्हा का दाखल केलास’ असा जाब विचारला. तो गुन्हा मागे घेऊन तुला माझ्याबरोबर बोलावेच लागेल, असे धमकावले. तू तसे केले नाहीस तर मोबाइलमधील तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी दिली.
त्या आक्षेपार्ह फोटोची भीती घालून मोईन याने तिला नदीकाठी, आमराईत त्याच्याबरोबर येण्यास भाग पाडले. तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर कोल्हापूर रस्त्यावरील एका लॉजवर दि.१९ जुलै २०२४ रोजी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला ‘तू कोणाशीच लग्न करायचे नाही. तू लग्न केले तर तुझ्या होणाऱ्या पतीला हे फोटो आणि व्हिडीओ दाखवणार आहे. माझ्या अटी मान्य केल्यास तर मी तुझ्याशी लग्न करतो, असे त्याने बजावले. त्यावेळी पीडितेने त्याच्या अटी धुडकावून तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून त्याच्यापासून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित मोईन नदाफ याने तिचा पाठलाग करून शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली आहे. अखेर पीडितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोईनवर गुन्हा दाखल केला.