लॉकडाऊनमुळे अशी वेळ आली... अन्यथा तीन लाखांचे नुकसान झाले नसते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:32 PM2020-04-17T13:32:25+5:302020-04-17T13:37:04+5:30
कोंगनोळी येथील शेतकरी राजू पोतदार यांचे एक एकर पेरुचे फळबाग क्षेत्र आहे. त्यांनी अतिशय कष्टाने यावर्षी पेरुची बाग लावून चांगले उत्पन्न आणले होते. दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ऐन फळ तोडणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण झाले.
शिरढोण (जि. सांगली) : कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकरी राजू पोतदार यांची सुमारे एक एकर क्षेत्रात पेरूची बाग असून,पेरू पिकून झाडावरून खाली पडायला लागले आहेत. ते सडत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व मार्केट बंद असल्याने पेरुचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
पोतदार यांनी मोठा खर्च करून ही पेरूची बाग वाढवली होती. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने मार्केट बंद आहे. राजू पोतदार या शेकऱ्यावर अक्षरशः पेरू फेकून देण्याची वेळ आली आहे.
कोंगनोळी येथील शेतकरी राजू पोतदार यांचे एक एकर पेरुचे फळबाग क्षेत्र आहे. त्यांनी अतिशय कष्टाने यावर्षी पेरुची बाग लावून चांगले उत्पन्न आणले होते. दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ऐन फळ तोडणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण झाले. त्याच बरोबर संपूर्ण मार्केटही बंद असल्याने पेरू पिकून झाडावरून खाली पडत आहेत, खराब होत चालले आहेत.
मार्च, एप्रिल या महिन्यात पेरुचा हंगाम सुरू असतो.
ऐन हंगामात सर्व पेरू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मालास चांगली मागणी येईल, चार पैसे हाती लागतील या अपेक्षेने पेरू बागायत शेतकऱ्यांनी पेरु उत्पादन केले होते. काही बागायदारांनी सोसायटी, पतसंस्था, बँकेमधून कर्ज काढून बागा लावल्या आहेत.
कोरोनाच्या या संकटामुळे मजूर नाहीत, बाजरपेठ उपलब्ध नाही त्यामुळे संपूर्ण पेरु फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोतदार यांनी पेरु रस्त्यावर व मळ्यात टाकून दिले आहेत. पर्यायाने सुमारे तीन लाखांचे त्यांचे नुकसान झाले आहे.
आम्ही पेरू बागायत शेतकरी आधीच कर्जाने हतबल झाले असून त्यात कोरोनामुळे हातातोंडाला आलेले फळ आता फेकून देण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे माझ्यासारख्या अन्य पेरू बागायतदारांचे आर्थिक नुकसान मोठे झाले आहे. : राजू पोतदार. पेरूबागायत शेतकरी कोंगनोळी.