जिल्ह्यात ८२१ जणांवर कारवाई; पावणेतीन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:21+5:302021-05-11T04:28:21+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरूच आहे. रविवारी दिवसभरात ...
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरूच आहे. रविवारी दिवसभरात ८२१ जणांवर विविध कलमांखाली कारवाई करीत दोन लाख ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर विनाकारण फिरणाऱ्या १२७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी संचारबंदीचे कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्यानुसार रविवारी ९५ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यास २५ पोलीस अधिकारी, २४२ पोलीस कर्मचारी आणि २२८ होमगार्ड बंदोबस्तावर होते. त्यांनी विनामास्क फिरणाऱ्या ३५६ जणांवर कारवाई करताना एक लाख ७१ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला, तर वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ४६५ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाख ४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी विनाकारण शहरात फिरणाऱ्या १२७ दुचाकी व चारचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिला आहे.
चौकट
बेकायदा दारूविक्रीवरही कारवाई
बंदोबस्ताबरोबरच बेकायदा दारूविक्रीवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रविवारी दिवसभरात सातजणांवर कारवाई करताना त्यांच्याकडून ८४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात देशी दारू, विदेशी मद्याचा समावेश आहे.