आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:37+5:302020-12-30T04:35:37+5:30
जत : ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी कोरोना संसर्ग व प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना गावात सभा घेण्यासाठी एक चारचाकी गाडी व दोन ...
जत : ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी कोरोना संसर्ग व प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना गावात सभा घेण्यासाठी एक चारचाकी गाडी व दोन दुचाकी मोटारसायकल आणि केवळ पन्नास नागरिकांना सभेसाठी उपस्थित राहता येणार आहे, याव्यतिरिक्त वाहनांचा वापर झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रचार यंत्रणा व आचारसंहितेत फेरबदल झाले आहेत. प्रचार कालावधित मोठ्या सभा उमेदवाराला घेता येणार नाहीत. जर सभा घेतली, तर त्यासाठी पन्नास नागरिकांना उपस्थित राहता येणार आहे. निवडणूक प्रचारात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून निवडणूक आयोगाने खबरदारी घेऊन आचारसंहिता लागू केली आहे. घरोघरी फिरून प्रचार करण्यासाठी उमेदवारांसह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. जादा कार्यकर्ते आढळून आले, तर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग झाल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी एकत्र येणे, मिरवणुकीचे आयोजन करणे यासाठी वेगळे निकष लावण्यात आले आहेत. पन्नास नागरिकांची सभा घेण्याचे नियोजन असल्यास त्यासाठी मैदानाची पाहणी, सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून त्या मैदानावर चिन्हांकित खुणा करण्यात येणार आहेत. याशिवाय मेळाव्यासाठी उपस्थित असणारे नागरिक व उमेदवार यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात की नाही, याची सतत पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक खबरदारीची उपाययोजना म्हणून फेस मास्क, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर आदी उपाययोजना उमेदवाराला कराव्या लागणार आहेत. याचे उल्लंघन करता येणार नाही. उल्लंघन झाले, तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही तहसीलदार सचिन पाटील यांनी दिला आहे.