मालमत्तेच्या वादातून सांगलीत दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:51 PM2019-03-29T13:51:00+5:302019-03-29T13:52:05+5:30
मालमत्तेच्या वादातून मार्केट यार्डसमोरील देवचंद्र औषध विक्रीच्या दुकानासमोर दोन गटात जोरदार मारामारी झाली. दोन्ही गटाने दगड व काठीचा वापर केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. गुरुवारी सव्वातीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १५ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : मालमत्तेच्या वादातून मार्केट यार्डसमोरील देवचंद्र औषध विक्रीच्या दुकानासमोर दोन गटात जोरदार मारामारी झाली. दोन्ही गटाने दगड व काठीचा वापर केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. गुरुवारी सव्वातीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १५ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम अजितप्रसाद पाटील (वय २८, रा. श्रीपद्मा बंगला, धामणी रस्ता, सांगली) याने दिलेल्या फिर्यादीवरुन तिलकराज पाटील, धनंजय श्रीकांत पाटील, तेजस धनंजय पाटील, तेजस्विनी धनंजत पाटील व अनोळखी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित मार्केड यार्डसमोरील देवचंद्र औषध विक्रीच्या दुकानामागे राहतात.
दुसऱ्या गटाकडून तिलकराज धनंजय पाटील (२७, देवचंद्र बंगला, मार्केट यार्ड, सांगली) याच्या फिर्यादीवरुन अजित पाटील, शुभम पाटील, विजय वडर, समीर (पूर्ण नाव निष्पन्न नाही) व अनोळखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम पाटील व तिलकराज पाटील यांच्यात मालमत्तेचा वाद सुरु आहे.
शुभम व त्याचे वडील देवचंद्र औषध दुकानासमोर उभा होते. तिथे दुचाकी लावण्यावरुन तिलकराज पाटील गटाशी त्यांचा वाद झाला. यातून तिलकराजसह सहा संशयितांनी काठी व दगडाने हल्ला केला. शुभम व त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली.
शिवीगाळ करुन तुम्हाला सोडत नाही, अशी धमकीही दिली, असे शुभमने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिलकराजने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुभम पाटीलसह नऊ संशयितांनी बेकायदा जमाव जमवून दुचाकी लावण्याच्या कारणावरुन दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या रुग्णालयाच्या दरवाजावर दगड पडल्याने त्याची काच फुटली. यामध्ये दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.