सांगलीत महागाईबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी कृती समितीने ठेवले डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 18:08 IST2021-06-14T18:05:21+5:302021-06-14T18:08:25+5:30
Sangli Morcha: वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. त्यांच्या घुसमटीला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी केले. महागाईविरोधात भावना व्यक्त करण्यासाठी शहरभरात पेट्या वितरीत केल्या. नागरीकांनी आपल्या भावना लिहून डब्यात टाकण्याचे आवाहन केले.

सांगलीत महागाईबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी कृती समितीने ठेवले डबे
सांगली : वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. त्यांच्या घुसमटीला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी केले. महागाईविरोधात भावना व्यक्त करण्यासाठी शहरभरात पेट्या वितरीत केल्या. नागरीकांनी आपल्या भावना लिहून डब्यात टाकण्याचे आवाहन केले.
येथील मारुती चौकातून सकाळी ५० हून अधिक डबे वितरीत करण्यात आले. पान टपऱ्या, हॉटेल्स, रिक्षा थांबे, किराणा दुकाने, पक्ष व संघटनांची कार्यालये आदी ठिकाणी ते ठेवण्यात आले. महागाईसंदर्भातील भावना लोकांनी लिहून डब्यात टाकण्याचे आवाहन समितीने केले. कविता, शेरोशायरी, चारोळ्या यासह सामान्य शब्दांतही भावना व्यक्त करता येतील. या उपक्रमाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
संयोजक सतीश साखळकर यांनी सांगितले की, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल या जीवनावश्यक बाबींची वर्षभरापासून सतत दरवाढ सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार आणि उत्पन्नाचे स्त्रोत ठप्प झाले असताना महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईविरोधात लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्या जाणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पृथ्वीराज पवार म्हणाले की, महागाईमुळे लोकांचे जगणे असह्य झाले आहे.
उमेश देशमुख म्हणाले की, केंद्र सरकार लॉकडाऊनमध्ये मदत करण्याऐवजी लोकांच्या संकटात भर घालत आहे. डॉ. संजय पाटील म्हणाले की, लोकांच्या सुखदुखांशी सरकारला काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
यावेळी पूजा पाटील, बटू बावडेकर, युनूस शेख, चंद्रकांत सूर्यवंशी, राहूल पाटील, संभाजी पोळ, लालू मेस्त्री, कामरान सय्यद, असिफ बावा, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, आनंद कांबळे हेदेखील उपस्थित होते.
केंद्राला भावना कळवणार
कृती समितीने सांगितले की, महागाईविरोधात लोकांनी व्यक्त केलेल्या भावना केंद्र सरकारला कळवणार आहोत. काही महत्वाच्या व विशेष प्रकारे व्यक्त झालेल्या भावना डिजीटल फलकांद्वारे शहरात ठिकठिकाणी लावल्या जातील.