नागज फाट्यावर चोरटे जेरबंद, स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:24 PM2017-10-26T16:24:26+5:302017-10-26T16:46:33+5:30
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून चोरट्यांची टोळी जेरबंद केली. एकूण चारजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सांगली , दि. २६ : कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून चोरट्यांची टोळी जेरबंद केली. एकूण चारजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
रमेश शंकर नाईक (वय २६, रा. कलोती, ता. अथणी), विजयकुमार ऊर्फ आकाश शंकर पाटील (२१, रा. डफळापूर, ता. जत), सतीश शिवाजी कोळी (२७, घाटनांद्रे) व रोहित कोळी (२५, रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दरोडे, मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने यांनी पेट्रोलिंगचे आदेश दिले होते.
१८ आॅक्टोबर रोजी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पेट्रोलिंग करीत असताना खास बातमीदाराकडून चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नागज फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रमेश नाईक याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली.
पोलिसांनी विजयकुमार पाटील, सतीश कोळी व रोहित कोळी या तिघांना ताब्यात घेतले. या चौघांकडून दोन किलो १३० ग्रॅम चांदीचे दागिने, २१ ग्रॅम ८२० मिलिग्रॅम सोन्याचे दागिने, सोनार कानस, डायऱ्या , अंगठी, रॉड असे साहित्य व गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल असा एकूण १ लाख ७६ हजार ८१० रुपयांचा माल हस्तगत केला. ही कारवाई निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून करण्यात आली.