बुधगाव येथे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्यावर कारवाई; पोलिसांकडून दोन पिस्तुलांसह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
By शरद जाधव | Published: April 23, 2023 06:36 PM2023-04-23T18:36:08+5:302023-04-23T18:36:23+5:30
बुधगाव येथे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सांगली : बुधगाव (ता.मिरज) येथे कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. दीपक जयसिंग रजपूत (वय ३७, रा. राममंदिरजवळ, बुधगाव ता.मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसेसह अन्य असा एक लाख ४७ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दहशत माजविण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित रजपूत हा कमरेला पिस्तूल लावून दुचाकीवरून गावात फिरत आहे. त्यानुसार बुधगाव येथील स्मशानभूमीजवळ त्याला अडवून झडती घेतली. यात त्याच्याजवळ पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दुचाकी असा ९१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करत त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
रजपूत याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने घरात एक पिस्तूल असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस पथकाने छापा मारून त्याच्या घरातून पिस्तूल व जिवंत काडतुसे असा ५१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण मगदूम, मेघराज रूपनर, हेमंत ओमासे, अरुण औताडे, कुबेर खोत, संदीप नलवडे, कपिल साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
आठवड्यात दुसरी कारवाई
चारच दिवसांपूर्वी पोलिसांनी बुधगाव येथेच संदीप आनंदा निकम याच्यावर कारवाई केली होती. रजपूत याने ही पिस्तुले निकम याच्याकडूनच घेतल्याचे पोलिसांना सांगितले. रजपूत हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.