व्यवसाय परवाना नसेल तर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:57+5:302021-03-21T04:24:57+5:30
सांगली : एप्रिलपासून महापालिका क्षेत्रात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यावसायिकांसाठी २३ ते २६ मार्च या ...
सांगली : एप्रिलपासून महापालिका क्षेत्रात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यावसायिकांसाठी २३ ते २६ मार्च या कालावधीत व्यवसाय परवाना शिबिर आयोजित केले आहे. त्यात सहभागी होऊन नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
येत्या १ एप्रिलपासून सर्व व्यवसायधारकांच्या परवान्यांची महापालिकेकडून तपासणी केली जाणार असून ज्यांच्याकडे महापालिकेचा व्यवसाय परवाना नसेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सांगलीतील प्रभाग १ आणि २ अंतर्गत येणाऱ्या व्यवसाय धारकांसाठी महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात, कुपवाड प्रभाग समिती ३ अंतर्गत येणाऱ्यांसाठी कुपवाड विभागीय कार्यालयात तर मिरजेतील व्यवसायधारकांसाठी मिरज विभागीय कार्यालयात २३ मार्च ते २६ मार्चअखेर सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत व्यवसाय परवाना विक्री परवाना शिबिर आयोजित केले आहे.
शिबिरात ज्या व्यवसायधारकाकडे महापालिकेचा व्यवसाय परवाना नाही अशा ९१ प्रकारच्या सर्व व्यवसायांना महापालिकेकडून कमी कागदपत्रात तसेच सुलभतेने व्यवसाय विक्री परवाना दिला जाणार आहे. यामध्ये पानपट्टीपासून ते मोठ्या कारखान्यापर्यंत सर्व व्यवसायांचा समावेश आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या शिबिराचा महापालिका क्षेत्रातील व्यवसाय धारकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या सुरू असणाऱ्या व्यवसायाचा परवाना काढून आपल्यावरील कारवाई टाळावी, असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.