युरियाचे लिंकिंग केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:28 PM2020-01-11T17:28:26+5:302020-01-11T17:29:13+5:30
सांगली जिल्ह्यात कुठेही युरियाची टंचाई नसून तीन हजार ९५५ टन युरिया शिल्लक आहे, आणखी दोन हजार टन युरिया दोन दिवसात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.
सांगली : जिल्ह्यात कुठेही युरियाची टंचाई नसून तीन हजार ९५५ टन युरिया शिल्लक आहे, आणखी दोन हजार टन युरिया दोन दिवसात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली. तसेच युरिया खरेदीसाठी डीलर अथवा विक्रेत्यांनी अन्य खताचे लिंकिंग केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही मास्तोळी यांनी दिला आहे. तासगाव तालुक्यातील अनेक विक्रेत्यांचीही शुक्रवारी पाहणी केली असून, कुठेही युरियाची टंचाई नाही, असे ते म्हणाले.
तासगाव तालुक्यात युरियाची टंचाई असल्याचे सांगून कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधींनी केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मास्तोळी यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी तासगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर मास्तोळी सांगलीत आले होते. यावेळी त्यांना युरिया टंचाईबाबत विचारले असता, ते बोलत होते.
ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या तीन हजार ९५५.४९ टन युरिया शिल्लक आहे. येत्या दोन दिवसात दोन हजार टन युरिया अजून येत आहे. जिल्ह्यात कुठेही रासायनिक खताची टंचाई निर्माण होणार नाही, याकडे आमचे बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक तालुक्यातील अधिकारीही खताच्या साठ्याबाबत लक्ष ठेवून आहेत. काही ठिकाणी विक्रेत्यांनी डीलरकडून युरिया खताबरोबर अन्य खते घेण्यासाठी सक्ती केली जात आहे, अशा तक्रारी आहेत. विक्रेते आणि डीलरनी कोणत्याही खताबाबत लिंकिंग करुन खत विक्री करु नये, अशी सक्त सूचना आहे. जर एखाद्या डीलरने विक्रेत्यांची इच्छा नसताना त्यांना सक्तीने अन्य खते दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मास्तोळी यांनी दिला आहे.