सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख वीज ग्राहकांकडे २५ कोटींवर थकबाकी, महावितरणकडून कारवाईच्या नोटिसा
By अशोक डोंबाळे | Published: August 29, 2023 12:47 PM2023-08-29T12:47:07+5:302023-08-29T12:47:36+5:30
जिल्ह्यातील २९५३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
सांगली : जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार १२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीज ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. सध्या महावितरणकडून २ हजार ९५३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक असे ६ लाख ५७ हजार एकूण वीज ग्राहकांची संख्या आहे. यापैकी १ लाख ८४ हजार १२७ वीज ग्राहकांकडे २४ कोटी ९५ लाख रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. जिल्ह्यात घरगुती १ लाख ६७ हजार ८०७ ग्राहकांकडे १८ कोटी ७८ लाख रुपये, वाणिज्यिक १४ हजार ३७१ ग्राहकांकडे ३ कोटी ९० लाख रुपये आणि औद्योगिक १ हजार ९४९ ग्राहकांकडे १ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे.
त्यामुळे गेल्या २५ दिवसात दोन हजार ९५३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजग्राहकांनी थकित बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून केले आहे.
शनिवारी, रविवारीही वीजबिल भरणा केंद्र सुरु
वीजग्राहकांना चालू व थकित वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीज बिल थकित असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अनधिकृत वीज जोडणी केल्यास कारवाई
महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीज जोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदाराने शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून केबलद्वारे विजेचा वापर असल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.