औषधांवरील जीएसटी सवलतीतून नफेखोरी केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:46+5:302021-06-17T04:18:46+5:30
सांगली : जीएसटी परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना उपचार करण्यासाठी वापरली जाणारी विविध औषधे, उपकरणे यावरील जीएसटी दर कमी ...
सांगली : जीएसटी परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना उपचार करण्यासाठी वापरली जाणारी विविध औषधे, उपकरणे यावरील जीएसटी दर कमी केले आहेत. त्याचा लाभ रुग्णांना देणे बंधनकारक आहे. तसे न करता नफेखोरी केल्यास कारवाई करण्याचा इशारा जीएसटी विभागाने दिला आहे.
जीएसटी परिषदेने मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, टोसीलीजुमेब, रेमडेसिविर, कोविड - १९ टेस्टिंग किट्स , हँड सॅनिटायझर, ताप मापक उपकरण, पल्स ऑक्सिमीटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर/जनरेटर, रुग्णवाहिका आदींवरील करात कपात केली आहे. कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ही दर सवलत ३० सप्टेंबर २०२१पर्यंत राहणार आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना तर याचा फायदा होईलच, पण इतरही रुग्णालये या कर सवलतींचा फायदा घेण्यासाठी पुढे येऊ शकतात.
हे दर कमी झाल्यानंतर त्याचा फायदा ग्राहकांना देणे हे केंद्रीय जीएसटी कायद्यानुसार बंधनकारक आहे. राष्ट्रीय नफेखोरी प्रतिबंधक यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे. कायद्यानुसार या दर कपातीचा फायदा हा ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे, अन्यथा अशा व्यवसायांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कर कपातीचा फायदा जर ग्राहकाला दिला नाही तर जादा घेतलेली रक्कम ही नफा ठरु शकते व संबंधित व्यक्ती दंडासाठी पात्र होऊ शकते. ग्राहकांनी अशी तक्रार यंत्रणेकडे करावी, असे आवाहनही जीएसटी विभागाने केले आहे.