वाळू ठेकेदारांचे बोजे उतरविणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: March 20, 2017 11:45 PM2017-03-20T23:45:47+5:302017-03-20T23:45:47+5:30
सदाभाऊ खोत : पाणी योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; इस्लामपुरात आढावा बैठक
इस्लामपूर : महसूल विभागाने पूर्वी वाळवा तालुक्यातील ठेकेदारांना १५० कोटी दंडाच्या नोटिसा काढून तसे बोजे मालमत्ता उताऱ्यावर चढवले होते. मात्र शासनाच्या आदेशाशिवाय बेकायदेशीरपणे हे बोजे उतरले असतील, तर संबंधितांना निलंबित करुन त्यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. याचवेळी जिल्ह्यातील पाणी योजनांमध्ये गैरकारभार करणारांविरुध्द फौजदारी कारवाई करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
येथील राजारामबापू नाट्यगृहात विविध शासकीय विभागांची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी खोत यांच्यासह आमदार शिवाजीराव नाईक, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सविता लष्करे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, गौरव नायकवडी, जि. प. सदस्या सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, जयराज पाटील, नंदकुमार कुंभार, एल. एन. शहा, सुखदेव पाटील, प्रा. एस. के. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत मंत्री खोत यांनी, वीज, पाणी पुरवठा, रस्ते, कृषी, पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा अशा विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांनी महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. २0१३ नंतरचे वीज कनेक्शन मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. निधीअभावी महावितरणची कामे रखडल्याचे त्यांनी खोत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री खोत यांनी, गुरुवारी ऊर्जामंत्र्यांशी बैठक घेऊन १५९ कोटी रुपयांच्या निधीबाबत चर्चा करू, असे स्पष्ट केले.
बळीराजाच्या बी. जी. पाटील यांनी महावितरणवर टीकेची झोड उठवली. ग्राहकाला तीन महिन्यात वीज जोडणी देण्याचा विद्युत नियामक आयोगाचा आदेश आहे. मात्र या आदेशाचा अवमान होतो आहे. विजेअभावी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महादेववाडी (ता. वाळवा) या गावचा पाणी पुरवठा बंद असल्याकडे जि. प. सदस्य जगन्नाथ माळी यांनी लक्ष वेधले. त्यावर खोत यांनी, प्रांत व तहसीलदारांना तातडीने या गावाला भेट देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढा, त्यामध्ये कोणी आडवे आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी सूचना केली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये असणाऱ्या जागांचा शेतमाल खरेदी-विक्रीसाठीच वापर झाला पाहिजे. असा वापर होत नसेल तर कारवाई करा. इस्लामपूर बाजार समितीचा अहवाल लवकरात लवकर द्या, अशीही सूचना त्यांनी केली.
सावळवाडी पुनर्वसन वसाहतीमध्ये २० वर्षांत विकासकामे झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. खोत यांनी, अधिवेशन संपताच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही दिली.
गौरव नायकवडी म्हणाले, धरणग्रस्तांच्या अपेक्षा जास्त नाहीत, त्या तरी पूर्ण करा. मायक्रो फायनान्स कंपनीविरुध्द महिला बचत गटांनी तहसीलदारांकडे तक्रारी द्याव्यात, वसुली करायला येणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाईल, असे खोत यांनी सांगितले. (वार्ताहर)