‘अंनिस’कडून भोंदूचा पर्दाफाश तोंडोलीत कारवाई : भक्तांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:18 AM2017-11-05T00:18:16+5:302017-11-05T00:21:19+5:30
कडेगाव : तोंडोली (ता. कडेगाव) येथे आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून थेट देवाशी संवाद साधून भक्तांच्या समस्या सोडविण्याचा दावा करणारा भोंदू
कडेगाव : तोंडोली (ता. कडेगाव) येथे आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून थेट देवाशी संवाद साधून भक्तांच्या समस्या सोडविण्याचा दावा करणारा भोंदू तानाजी महादेव कुंभार ऊर्फ कुंभार महाराज (वय ६०) व त्याच्या दोन साथीदारांना कडेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर ‘जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत’ कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाºयांनी या भोंदूबुवाचा पर्दाफाश केला.
महाराज दर गुरुवारी व पौर्णिमेला दरबार भरवतो. शनिवारी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरात पूजा झाल्यावर दरबार सुरू करून महाराजाने भक्तांची गाºहाणी ऐकण्यास सुरुवात केली. समस्या घेऊन येणाºया प्रत्येकाला शंभर रुपये फक्त नोंदणी शुल्क जमा करून रांगेत बसविले जात होते. त्यानुसार भगवान रणदिवे व प्रशांत पोतदार समस्या घेऊन पैसे भरून रांगेत बसले. त्यांचा नंबर आल्यावर महाराजांनी बोलावून घेतले.
रणदिवे यांनी घरात शांतता नाही, भांडणे व वाद होतात, अशी तक्रार केली. महाराजांनी दैवी शक्तीद्वारे थेट परमेश्वराशी संवाद साधण्याचे नाटक केले. वहीमध्ये विचित्र लिखाण करून माझे देवाशी बोलणे झाले, तुझी समस्या सुटेल, माझ्या दैवी सामर्थ्याने सर्व समस्या सुटतात, असे सांगितले. नारळ, सुपारी घेऊन ते पांढºया कपड्यात बांधून जोतिबा मंदिरात जाऊन त्यावर गुलाल टाका आणि ते घराच्या आड्याला बांधण्याचा सल्ला दिला. तसेच मंतरलेला अंगारा दिला. हा सगळा प्रकार चालू असताना, साध्या वेशातील पोलिसांनी भोंदूची पद्धत पाहिली.
हा सर्व प्रकार कॅमेºयात चित्रीत करण्यात आला. कुंभार महाराजाचे स्टिंग आॅपरेशन केल्यावर पोलिस अधिकाºयांनी छापा टाकून बुवाबाजीचे साहित्य, मंतरलेल्या पुड्या, गंडेदोरे, रोख रक्कम, नोंद वही व महाराजाचे लिखाण ताब्यात घेतले. कुंभार महाराज, त्याचे साथीदार सोपान निवृत्ती महाडिक (रा. नेवरी), नवनाथ यमगर (रा. नेवरी) यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सचिव भगवान रणदिवे, सांगली जिल्हा कार्याध्याक्ष अजय भालकर, अवधूत कांबळे, विजय नांगरे व इंद्रायणी पाटील यांनी या मोहिमेत भाग घेतला. पोलिस उपाधीक्षक अमरसिंह निंबाळकर यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस उपनिरीक्षक शिरतोडे, हवालदार एस. पी. बांगर, एम. डी. जाधव, ए. एल. आंबेकर, एम. एस. महाडिक, व्ही. डी. वुंडे यांनी कारवाई केली.
अनेक वर्षांपासून बुवाबाजी
कुंभार महाराज हा गेल्या अनेक वर्षांपासून बुवाबाजी करून लोकांची फसवणूक करत असल्याची तक्रार अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे आली होती. कुंभार महाराजाचा पर्दाफाश करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कडेगाव पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार शनिवारी दुपारी कार्यकर्ते व साध्या वेशातील पोलिस पथक थेट कुंभार महाराजाच्या दरबारात दाखल झाले. स्टिंग आॅपरेशन करून त्याच्या बुवाबाजीचा भांडाफोड केला.