‘रोहयो’च्या चौकशीत कुचराई केल्यास कारवाई--जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:41 PM2017-09-13T22:41:26+5:302017-09-13T22:42:48+5:30
सांगली : पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील रोजगार हमी योजनेतील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, तसेच कारवाईचा अहवाल तातडीने सादर करावा. चौकशीच्या कामात कुचराई केल्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील रोजगार हमी योजनेतील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, तसेच कारवाईचा अहवाल तातडीने सादर करावा. चौकशीच्या कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी बुधवारी रोजगार हमी विभागाच्या अधिकाºयांना दिला.
या घोटाळ्याची काही ग्रामस्थांनी लेखी पुराव्यासह पोलखोल केली आहे. सुमारे एक कोटी ३० लाख रुपयांचा गैरकारभार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४१ लाखांच्या मुरुमाची पावती नाही. २१ रस्त्यांच्या कामांत गडबड झाली आहे. कोणत्याही कामाची गुणनियंत्रक खात्याकहून पाहणी नाही. मस्टरमध्ये मृत व्यक्ती, प्रसुतीच्या दिवशी महिला, लग्नाच्या दिवशी मुली, अंगणवाडी सेविका, बँक कर्मचारी, मनोरुग्ण महिला, जिल्हा परिषद शिक्षक, सोसायटी कर्मचारी, शिकण्यासाठी परगावी असलेले विद्यार्थी अशी अनेक बोगस नावे घालून रक्कम काढली आहे. काही जॉब कार्ड बोगस बनविली आहेत.
ब्रह्मनाळमधील बजेट वापरुन धनगाव, भिलवडी, खंडोबाचीवाडी, वसगडे येथील कामे दाखवून रक्कम उचलली आहे.
प्रत्येक रस्त्यासाठी एकसारखाच खर्च दाखविला आहे. यात पंचायत समितीतील अधिकारी, कंत्राटदार, ग्रामसेवक व गावातील काही नेतेमंडळींचा सहभाग आहे, असा आरोप ग्रामस्थांचा आहे. याची सखोल चौकशी करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी पलूस तालुक्यातील रोजगार हमीच्या कामातील घोटाळ्याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार पलूस तालुक्यातील सर्वच रोजगार हमी कामांची तातडीने सखोल चौकशी करण्याचे आदेशही काळम-पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व रोजगार हमी योजना अधिकारी किरण कुलकर्णी यांना दिले. याप्रकरणी अभिजित राऊत आणि किरण कुलकर्णी यांच्याकडून रोजगार हमी कामाचा आढावाही काळम-पाटील यांनी बुधवारी घेतला. यामध्ये कुणालाही पाठीशी न घालता, चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.
प्रांताधिकाºयांमार्फत चौकशी सुरु
पलूस तालुक्यातील रोजगार हमीतील कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्या प्रांताधिकारी यांच्यामार्फत सुरु असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी, हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे सखोल चौकशी करावी, याबाबतचा चौकशी अहवाल मला तातडीने द्यावा, दोषी आढळणाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा आदेश दिला.