आळसंदला ऊस वाहतुकीच्या बैलगाडी मालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:23+5:302020-12-24T04:24:23+5:30
विटा : साखर कारखान्यांसाठी बैलगाडीतून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी मालकांनी क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून बैलांचा छळ केल्याप्रकरणी जिल्हा प्राणीक्लेश ...
विटा : साखर कारखान्यांसाठी बैलगाडीतून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी मालकांनी क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून बैलांचा छळ केल्याप्रकरणी जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती व जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली आळसंद (ता. खानापूर) येथील बैलगाडी मालकांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
सध्या ऊस गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. अनेक साखर कारखान्यांना बैलगाडीतून ऊस वाहतूक केला जातो. मात्र, साखर आयुक्त व पशुसंवर्धन आयुक्तांनी आदेश काढून बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून बैलांचा छळ करू नये. तसेच बैलांना इजा अथवा दुखापत होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे सांगितले आहे. परंतु, अनेक बैलगाडी मालक व चालक जास्त पैसे मिळावेत यासाठी क्षमतेपेक्षा जादा ऊस भरून वाहतूक करतात. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख गेडाम यांनी जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची स्थापना केली असून या समितीच्या पथकाने जिल्हाभर तपास मोहीम हाती घेतली आहे.
त्या पार्श्वभूमीवर या पथकाने आळसंद येथील कारखान्यासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या बैलगाड्यांची तपासणी केली. त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याचे निदर्शनास आले. वांगी गावाजवळ बैलगाडीच्या सापटीला काटेरी तार लावल्याचेही दिसून आले. त्यामुळे या समितीचे प्रमुख सुनील हवालदार, सहाय्यक पोलीस फौजदार अशोक डांगे, आरती गायकवाड, सचिन कनप, इजाज आतार यांच्यासह पथकाने बैलांना त्रास दिल्याप्रकरणी नऊ बैलगाडी मालकांवर गुन्हा दाखल केला.
फोटो - २३१२२०२०-ऊस बैलगाडी ०१ किंवा ०२ : साखर कारखान्यांसाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून व काटेरी तारेचा वापर करणाऱ्या मालकांवर जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीने कारवाई केली.