बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक गांधीनगरात कारवाई : साडेसात हजारांच्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:09 AM2019-01-20T01:09:34+5:302019-01-20T01:15:15+5:30
गांधीनगर (ता. करवीर) येथे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या अभिजित राजेंद्र पवार (वय ३७, रा. उचगावपैकी निगडेवाडी, ता. करवीर) या तरुणाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५००, २००, १०० व ५० रुपयांच्या ७५५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर/गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या अभिजित राजेंद्र पवार (वय ३७, रा. उचगावपैकी निगडेवाडी, ता. करवीर) या तरुणाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५००, २००, १०० व ५० रुपयांच्या ७५५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अभिजित पवार हा शुक्रवारी (दि. १८) बनावट नोटांची विक्री करण्यासाठी गांधीनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने गांधीनगर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पवार या ठिकाणी आला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे भारतीय चलनासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या ५०० रुपयांच्या आठ, २०० रुपयांच्या आठ, तर शंभर रुपयांच्या १७ व ५० रुपयांच्या पाच अशा सुमारे ७५५० रुपयांच्या नोटा सापडल्या.
या नोटा संशयित विश्वनाथ सुहास जोशी व प्रवीण अजितकुमार उपाध्ये (रा. इचलकरंजी) यांनी सांगलीत तयार करून त्याला विक्री करण्यासाठी दिल्या असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या टोळीकडून आणखी बºयाच नोटा चलनात आणल्या असल्याची शक्यता आहे. ही कारवाई करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, सहायक फौजदार राजू भोसले, आकाश पाटील, महादेव रेपे, नारायण गावडे, आयुब शेख, उदय खुडे यांनी केली. अतुल कदम तपास करीत आहेत.
सांगलीत छापा
सांगलीतील शामरावनगरमधील अरिहंत कॉलनीत एका बंगल्यावर छापा टाकून नोटांच्या छपाईसाठी लागणारा स्कॅनर, प्रिंटरही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून या कारवाईवेळी पाचशेच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याचे समजते. गांधीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली
आहे.
बनावट नोटाप्रकरणी सांगलीत बंगल्यावर छापा
एकजण ताब्यात : गांधीनगर पोलिसांची कारवाई; स्कॅनर, प्रिंटर जप्त
सांगली : येथील शामरावनगरमधील अरिहंत कॉलनीत एका बंगल्यावर छापा टाकून नोटांच्या छपाईसाठी लागणारा स्कॅनर, प्रिंटरही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, या कारवाईवेळी पाचशेच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याचे समजते. गांधीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे. या कारवाईचा तपशील सांगण्यास गांधीनगर पोलिसांनी नकार दिला.
गेल्या सहा महिन्यांपासून सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत बनावट नोटा बाजारात आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन-तीन टोळ्यांना जेरबंदही केले आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगलीत संजयनगरच्या आठवडा बाजारात दोनशे रुपयांच्या पाच बनावट नोटा खपविल्याचा प्रकार घडला होता. शामरावनगरमध्ये अरिहंत कॉलनीत एका बंगल्यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करण्याचा कारखाना असल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक शनिवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले. या पथकाने बंगल्यावर छापा टाकला. तब्बल दोन तास घराची झडती सुरु होती. यामध्ये पाचशेच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याचे समजते. याशिवाय नोटांच्या छपाईसाठी लागणारा स्कॅनर, प्रिंटरही जप्त केला आहे. एकाला ताब्यात घेऊन हे पथक कोल्हापूरला रवाना झाले. यामध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. गांधीनगर पोलिसांशी संपर्क साधला, पण त्यांनी कारवाई सुरु आहे, असे सांगून तपशील सांगण्यास नकार दिला.
सांगली पोलीस अनभिज्ञ
सांगलीत बनावट नोटांप्रकरणी कारवाई करताना गांधीनगर पोलिसांनी सांगली पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. अत्यंत गोपनीयरीत्या कारवाई केली; पण कारवाईची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने शामरावनगरला धडक दिली. ज्या बंगल्यावर कारवाई झाली, तो बंगला शोधण्यासाठी त्यांना तासभर लागला.