अकरावीला जादा शुल्क आकारल्यास कारवाई : महेश चोथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 01:16 AM2018-06-16T01:16:49+5:302018-06-16T01:16:49+5:30
अकरावीची प्रवेश प्रक्रिया दि. २५ जूनपासून सुरु होणार आहे. सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी कार्यकारी समितीने निश्चित केल्याप्रमाणे शुल्क आकारावे, नियमापेक्षा जादा शुल्क आकारणी केल्यास कॉलेजला एक ते पाच लाखापर्यंत दंडाची
सांगली : अकरावीची प्रवेश प्रक्रिया दि. २५ जूनपासून सुरु होणार आहे. सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी कार्यकारी समितीने निश्चित केल्याप्रमाणे शुल्क आकारावे, नियमापेक्षा जादा शुल्क आकारणी केल्यास कॉलेजला एक ते पाच लाखापर्यंत दंडाची कारवाई होऊ शकते, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी दिला. उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीने घेण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांची बैठक शिक्षणाधिकारी चोथे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
चोथे म्हणाले की, सर्व शाळांनी शुल्क समिती निश्चित करावी. कार्यकारी समितीने अकरावीसाठी शुल्क निश्चित केले आहे, त्यानुसार आकारणी करावी. नफेखोरीसाठी जादा शुल्क घेऊ नये. जादा आकारणी केल्याचे सिद्ध झाल्यास एक ते पाच लाख रुपयांचा दंड उच्च माध्यमिक विद्यालयास होऊ शकतो. याबाबत दुसरी चूक आढळल्यास दोन ते दहा लाख रुपयांचा दंड होऊ शकतो, अन्यथा घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येईल.
उच्च माध्यमिक शाळांत बायोमेट्रिक हजेरी घेण्यात यावी. त्यांना वेतनेतर अनुदान देण्यात आले आहे, त्यामधून बायोमेट्रिक यंत्र खरेदी करण्यात यावे. हजेरीचा नियमित अहवाल ठेवावा. कनिष्ठ महाविद्यालयाने दि. १५ आॅगस्टपर्यंत शिक्षक-पालक संघ स्थापन करुन पहिली बैठक घ्यावी. दि. ३० आॅगस्टपर्यंत कार्यकारी समितीची स्थापना करावी. ती निश्चित झाल्याची माहिती कळविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या.सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक माधुरी गुरव यांनी प्रास्ताविक केले.