जतमधील बारा शिक्षकांवर कारवाई

By Admin | Published: March 12, 2016 12:18 AM2016-03-12T00:18:55+5:302016-03-12T00:19:11+5:30

मराठी, उर्दू शाळेतील शिक्षक अनुपस्थित : बीडीओ, गटशिक्षण अधिकाऱ्यांची कारवाई

Action for the Twelve Teachers of the University | जतमधील बारा शिक्षकांवर कारवाई

जतमधील बारा शिक्षकांवर कारवाई

googlenewsNext

जत : तालुक्यातील गुगवाड व वज्रवाड येथील चार जिल्हा परिषद कन्नड, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांना पंचायत समिती गटविकास अधिकारी ओमराज गहाणे व गटशिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी अचानक भेट देऊन शाळेची तपासणी केली. यावेळी एका मुख्याध्यापकासह बारा शिक्षक शाळेत वेळेवर उपस्थित नसल्याने, एक दिवस विनावेतन किंवा त्यांचा घरभाडेभत्ता बंद करण्यासंदर्भात विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे ओमराज गहाणे यांनी सांगितले.
गुगवाड जि. प. कन्नड, उर्दू व मराठी प्राथमिक शाळा आणि गुगवाडखालील अंदोनी वस्ती जि. प. शाळा, वज्रवाड येथील कन्नड व मराठी जि. प. प्राथमिक शाळा येथील शिक्षक आणि मुख्याध्यापक वेळेवर शाळेत येत नाहीत, अशा तक्रारी येथील नागरिकांमधून होत होत्या. याची दखल घेऊन गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी या शाळांना अचानक भेट देऊन तपासणी केली. यावेळी मुख्याध्यापक सिद्रामप्पा हदनूर, प्राथमिक शिक्षक एम. आर. पॅटी, एम. ए. निडोणी, एस. एस. जाऊर, आर. एम. मुसळी, एस. ए. मतवाल, एस. बी. साळुंखे, व्ही. व्ही. मोरे, एस. एस. उकिरडे, ए. बी. तिकोटी, विजय अहिओळी, एम. एस. तंगोळी हे बाराजण उपस्थित नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
उन्हाळ्यामुळे जि. प. प्राथमिक शाळा सकाळी सात ते साडेअकरा या वेळेत भरविण्यात येत आहेत. वरील सर्वजण आठ वाजण्याच्या दरम्यान शाळेत आले, तर मुख्याध्यापक सिद्रामप्पा हदनूर यांनी रजेचा अर्ज शाळेत लिहून ठेवला आहे. त्यावर तारीख आणि कोणत्या कारणासाठी रजा पाहिजे, ते लिहिलेले नाही. त्यामुळे कोणताही अधिकारी कधीही शाळेत आला तरी त्याला तोच रजेचा अर्ज दाखवून त्यांची दिशाभूल केली जात होती, हे शाळेत गेल्यानंतर आमच्या लक्षात आले आहे. अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हे सर्व शिक्षक सतत शाळेत वेळेवर येत नव्हते. परंतु हजेरी पुस्तकात मात्र साडेसहा वाजण्याच्या दरम्यान शाळेत उपस्थित असल्याची वेळ टाकून हजेरी पुस्तकात सही केली जात होती. या सर्व शिक्षकांना जत पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी बोलावून घेऊन त्यांची कानउघाडणी करण्यात आली. यापुढे असा प्रकार आढळून आल्यास माझे एक दिवसाचे वेतन व घरभाडे भत्ता बंद करण्यात यावा, असे त्यांच्याकडून लेखी लिहूनही घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अचानक तपासणी झाल्याने शिक्षक सतर्क झाले आहेत. यापुढील काळात याच पद्धतीने तालुक्यातील सर्वच जि. प. शाळांची अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचेही गहाणे यांनी सांगितले.
तालुक्यात कन्नड, मराठी व उर्दू माध्यमाच्या ४५३ जि. प. प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. तेथे एक हजार ४५० प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षण विभागाकडे शासकीय वाहन नाही. याशिवाय मंजूर सहा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी येथे कार्यरत नाही. सर्वच जागा रिक्त आहेत. दैनंदिन कार्यालयीन कामकाज व शासकीय बैठका सांभाळून शाळेची तपासणी आम्ही करत आहोत. या विभागातील रिक्त जागा भरल्यानंतर शिक्षण विभागाचा कारभार सुरळीत होणार आहे, असे गटशिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी सांगितले. (वार्ताहर)


मुख्याध्यापक उशिरा : तपासणीत उघड
गुगवाड जि. प. कन्नड, उर्दू व मराठी प्राथमिक शाळा आणि गुगवाडखालील अंदोनी वस्ती जि. प. शाळा, वज्रवाड येथील कन्नड व मराठी जि. प. प्राथमिक शाळा येथील शिक्षक आणि मुख्याध्यापक वेळेवर शाळेत येत नाहीत, अशा तक्रारी येथील नागरिकांमधून होत होत्या. याची दखल घेऊन गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी या शाळांना अचानक भेट देऊन तपासणी केली. यावेळी अनेक शिक्षक अनुपस्थित दिसले.

Web Title: Action for the Twelve Teachers of the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.