साखर उद्योगातील कृतिशील नेतृत्व पी. आर. पाटील (दादा)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:04+5:302021-01-22T04:24:04+5:30
लोकनेते राजाराबापूंना केंद्रबिंदू मानून त्यांच्याबरोबर सावलीसारखे राहिले. पाणी हे जीवन आहे आणि भूमी ही सर्वांची आई आहे. भू-माता सुजलाम-सुफलाम ...
लोकनेते राजाराबापूंना केंद्रबिंदू मानून त्यांच्याबरोबर सावलीसारखे राहिले. पाणी हे जीवन आहे आणि भूमी ही सर्वांची आई आहे. भू-माता सुजलाम-सुफलाम व्हायची असेल तर जमिनीस सर्वात प्रथम पाणी मिळाले पाहिजे व त्यातूनच कृषी औद्योगिक क्रांती होईल, या बापूंच्या विचाराशी ते समरस झाले. आपल्या पंचक्रोशीमध्ये कृषी औद्योगिक क्रांती व्हावी म्हणून बापूंनी साखराळे येथे सहकारी साखर कारखाना सुरू केला. त्यामध्ये तरुण वयातच दादांना प्रवर्तक मंडळामध्ये बापूंनी घेतले. तेथूनच दादांचा समाजकार्याचा प्रवास सुरू झाला व तो पुढे विस्तारीत होत गेला, बोरगाव येथील कृष्णा नदीवरील बंधारा तसेच वारणेवरील चांदोली धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून दादांनीही प्रयत्न केले.
वारणा नदीवरील चांदोली धरण
चांदोली धरणाचे काम लवकर वेळेप्रमाणे पूर्ण होणे गरजेचे होते. त्यासाठी बापू प्रयत्नशील होते. त्या कामामध्ये मा. दादांनी बापूंना साथ दिली. चांदोली धरणाचे काम सुरू होते. ते काम शेतकऱ्यांनी पहावे म्हणून चांदोली धरणावरच बापूंनी शेतकरी मेळावा घेतला व सर्वांना धरणाचे काम पाहण्याची संधी दिली. हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यामध्ये दादांनी खूप कष्ट घेतले व त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरला. आपल्या शेतीला पाणी मिळणार याची खात्री शेतकऱ्यांना झाली. धरण पूर्ण झाले. लोकनेते फत्तेसिंग राव नाईक (आप्पा) यांनी धरणातील पाणी शिराळा तालुक्याच्या उत्तर भागास मिळावे (वाकुर्डे बु. योजना) म्हणून चळवळ सुरू केली. यामध्ये अनेक विचार पुढे आले. माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. शरदचंद्र पवार यांनी मुंबई येथे या निर्णयावर बैठक घेतली. या प्रक्रियेमध्ये स्व. आप्पा, तसेच ना. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादांचा सहभाग महत्त्वाचा होता
कारखान्याच्या पाणीपुरवठा योजना
चांदोली धरणाचे पाणी शिराळा व वाळवा तालुक्याला पाटाने मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु धरणातील पाणी वारणा नदीमध्ये सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजना सुरू केल्या. कृष्णा व वारणा नदीवर पाणी पुरवठ्याचे जाळे पसरविण्याचे काम ना. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यामध्ये दादांचे कार्य व योगदान महत्त्वाचे आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होत असताना, दादांनी कुरळप व नजीकच्या गावातील योजना पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष घातले. माळराने हिरवीगार झाली. शेती सुजलाम सुफलाम झाली. खऱ्या अर्थाने स्व. बापूंचे स्वप्न साकार झाले. यासाठी दादांनी व ना. जयंतराव पाटील यांनी अविरत कष्ट केले. दादांच्या गावाशेजारीच शिराळा तालुक्याची हद्द येते. शिराळा तालुक्यातील हरितक्रांतीचे प्रणेते लोकनेते फत्तेसिंग नाईक (आप्पा) यांनीही विश्वास साखर कारखान्याच्या माध्यमातून पाणी योजना उभी करण्यास (उदा.कापरी, इंगरुळ रेड पाणी पुरवठा योजनेवर एक हजार ऊस आहे.) दादांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे.
राजारामबापू साखर कारखाना व शाखा
पाणी पुरवठा योजनांचे जाळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पसरल्यामुळे ऊसाचे उत्पादन वाढले. यामुळे कारखान्याचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण तसेच वीज निर्मिती होऊ शकली. त्याचप्रमाणे कारखान्याने वाटेगाव, कारंदवाडी, जत येथे युनिट सुरू केली. ना. जयंतराव पाटील यांचे अचूक मार्गदर्शन व योग्य निर्णयामुळे हे शक्य झाले. सर्व प्रकल्प उभा करण्यामध्ये दादांनी स्वतःला झोकून दिले. कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, अधिकारी, कामगार या सर्वांचे सहकार्य घेऊन उद्दिष्ट गाठले. सर्वांना बरोबर घेऊन जाताना संयम राखला. सर्वांचे प्रश्न सोडविण्यामध्ये दादा माहीर आहेत. त्यांच्या संयमी स्वभावाचा फायदा ना. जयंतराव पाटील, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांसह सर्वांनाच झाला. आजही दादा त्याच क्षमतेने चेअरमन म्हणून चारही साखर कारखान्यांचे काम पहात आहेत. दादांचा अभ्यास, ज्ञान, अनुभव यामुळे ते साखर उद्योगाचे दीपस्तंभ आहेत, यात शंका नाही.
विश्वास साखर कारखाना व दादा
नाईक कुटुंब व दादांचे नाते संबंध आहेत. स्व. आप्पा यांना ते आदरस्थानी मानत. त्यानंतर आम्हा सर्वांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. विश्वास साखर कारखान्याच्या प्रगतीमध्ये दादांचा व ना. जयंतराव पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते आमचे आधार स्तंभ आहेत. समाज कारणासाठी राजकारण असले पाहिजे, या विचारांचे आम्ही सर्वजण आहोत. सर्व अडी-अडचणीच्या प्रसंगी ते आम्हांस सहकार्याचा हात पुढे करतात. दादा हे विश्वासू मित्र आहेत.
दादांचे सार्वजनिक जीवन
दादा हे अजातशत्रू आहेत. चेहऱ्यावर हास्य ठेवून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची कला त्यांना लाभली आहे. यामुळे दादांना अगणित मित्रमंडळी लाभली आहे. सार्वजनिक जीवनामध्ये निरनिराळे कार्यक्रम, लग्ने,सुख-दुःखाचे प्रसंग अशा सर्वांमध्ये दादा हजर असतात. दादांचे कार्य असेच पुढे चालू राहील, यासाठी त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, ही सदिच्छा!!
आ. मानसिंग नाईक (भाऊ)