अग्रणीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या 'पोकलेन मशिन'चा वाढदिवस, दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:11 PM2022-10-11T12:11:23+5:302022-10-11T12:11:42+5:30
अग्रणी नदीच्या खोऱ्याची दुष्काळी पट्टा ही ओळख पुसून जलक्रांती करण्याच्या उद्देशाने जल बिरादरी गेल्या दशकभरापासून खोऱ्यात काम करत आहे.
कवठेमहांकाळ : ‘डिझेल गावकऱ्यांचे आणि मशिन जल बिरादरीचे’ या धर्तीवर शेकडो हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाचे काम करणाऱ्या पोकलेन यंत्राचा तिसरा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केला. दुष्काळी भागाला पाणीदार बनविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मशिनप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अग्रणी नदीच्या खोऱ्याची दुष्काळी पट्टा ही ओळख पुसून जलक्रांती करण्याच्या उद्देशाने जल बिरादरी गेल्या दशकभरापासून खोऱ्यात काम करत आहे. जल बिरादरीचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चुघ यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये याकामी पोकलेन मशिन सुपुर्द केले होते. सार्वजनिक जलसंधारणाचे काम करण्यासाठी संबंधित गावाने फक्त डिझेल द्यायचे आणि काम करून घ्यायचे, असे नियोजन केले. त्याला अनेक गावांनी प्रतिसाद दिला.
नांगोळे, पिंपळवाडी, अग्रण धुळगाव, रांजणी, कोकळे, खलाटी, डफळापूर, डोंगरसोनी, कुकटोळी, रामपूरवाडी आदी गावांत डीप सीटीसी, मातीनाला बांध, तलाव खोदाई, जुन्या तलावातील गाळ काढणे, ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण, वनतळे अशी अनेक कामे मशीनद्वारे झाली. सध्या कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे वनजमिनीवर काम सुरू आहे.
दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार लावणाऱ्या या मशिनप्रती कृतज्ञता म्हणून कार्यकर्त्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. मशीनची सजावट करून केक कापला. मिठाई वाटली.