‘कृष्णा’च्या संस्थापक पॅनेलचे कार्यकर्ते पुन्हा एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:01+5:302021-03-18T04:25:01+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच इस्लामपूर गटात संस्थापक ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच इस्लामपूर गटात संस्थापक पॅनेलचे पोस्टर झळकले आहे. पॅनेलप्रमुख अविनाश मोहिते यांनी वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. या ताकदीवर सहकार पॅनेलविरोधात आव्हान उभे करू, असे प्रचारप्रमुख युवराज पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एकीकडे वाळवा तालुक्यात सहकार पॅनेलच्या पाठीशी राष्ट्रवादीची फौज असताना, संस्थापक पॅनेलने राष्ट्रवादीतीलच काही कार्यकर्त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इस्लामपूर शहरात त्यांचे समर्थक युवराज पाटील यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच उरुण परिसरात ‘आमचं ठरलंय, आता बदल होणारच’ असे पोस्टर लावून प्रचाराचा नारळच फोडला आहे.
सत्ताधारी सहकार पॅनेलकडे राष्ट्रवादीचे सहा संचालक आहेत. हे संचालक आपापल्या परिसरात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. त्यांना आव्हान उभे करण्यासाठी त्यांच्याच तोडीच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव अविनाश मोहिते करीत आहेत. इस्लामपूूर शहरात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, बाळासाहेब पाटील, शैलेश पाटील, शिवाजी पवार, रघुनाथ खांबे यांना सोबत घेतले जात आहे. शिवाय उदय शिंदे, मानाजी पाटील (बोरगाव), नितीन खरात, अॅड. विजय खरात (खरातवाडी), संभाजी दमामे (बहे) यांची साथ आहे. नेर्ले येथे १६०० सभासद असून तेथे संस्थापक पॅनेलचे विद्यमान संचालक सुभाष पाटील, वसंतराव पाटील, सतीश पाटील, चंद्रकांत पाटील, शुभम पाटील, आदी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. संस्थापक पॅनेलची ही ताकद पाहता, सहकार पॅनेलपुढे आव्हान उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत.